सारोळे गावात एस आर टी पद्धतीने शून्य मशागत करून शेतीत जास्त उत्पन्न घेणारे शेतकरी.
सारोळे : भोर तालुक्यातील पूर्व भागातील पुणे सातारा महामार्ग लगत सारोळे गावातील शेतकरी रमेश लक्ष्मण धाडवे यांनी शून्य मशागत या तंत्रामध्ये सुरुवातीलाच गादीवाफेवर पिकांची लागवड करून जास्तीत जास्त उत्पन्न काढले. यासाठी त्यांना एस आर टी कृषी सन्मान सोहळा २०२४ या कार्यक्रमात एस आर टी शून्य मशागत पद्धत वापरून जास्तीत जास्त उत्पन्न घेतल्याबद्दल त्यांची दि.२२ मे रोजी पुरस्कारासाठी निवड झाली आहे.


सुरुवातीला बेड करताना नांगरट केली, त्यानंतर दोन ट्रॉली शेणखत सेंद्रिय खत टाकायचं आणि त्या मापाप्रमाणे बेड तयार करायचं. ते बेड तयार केल्यानंतर टोकन पद्धतीने बियाणे लावायचे. त्यानंतर ते पीक मोठे झाल्यानंतर कापायचे आणि ते कापल्यानंतर पिकाच्या ज्या मुळ्या राहिल्या आहेत त्याचेच परत खत तयार होते. दुसऱ्या वर्षी परत त्या शेताची कुठलीच मशागत करायची नाही, खत टाकायचं नाही, खुरपणी करायची नाही यामुळे कमी खर्चात उत्पन्न जास्त निघाले असे त्यांनी सांगितले.
सरासरी २५ गुंठे मध्ये एका वर्षामध्ये तीन पिके घेतली. पहिले भात शेती केली.
२० कट्टे तांदळाचे पीक घेतले. त्यामध्ये त्यांनी ६० हजार रुपयाचे पीक घेतले, नंतर गहू केला. गव्हाचे ८ कट्टे झाले. त्यामध्ये २०००० रुपयांचे पीक घेतले. पुढे त्यांनी त्याच बेडवरती भुईमुगाचे पीक घेतले. असे एकूण एका वर्षात त्यांनी ३ पिके घेतली.
एस आर टी पद्धतीने शेती करून पहिल्या पिकांची मुळे, तण जागीच ठेऊन कुज दिल्याने मोठया प्रमाणात गांडूळ निर्मिती होऊन जमीनीची सुपीकता वाढली आहे तसेच जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढलेला आहे. एस आर टी पद्धतीने शेती केल्याने खर्चात बचत होऊन उत्पादनात निश्चित वाढ होत असल्याने प्रयोगशील आणि प्रगतशील शेतकरी रमेश लक्ष्मण धाडवे पाटिल आनंदी आहेत.त्यांचा आदर्श घेत पंचक्रोशीतील बरेच शेतकरी एस आर टी पद्धतीने शेती करु लागले आहेत रमेश धाडवे पाटिल यांना एस आर टी पद्धतीने यशस्वी शेती करण्यासाठी एस आर टी अधिकारी योगेश बनसोडे आणि प्रयोगशील शेतकरी किरण यादव यांचे मार्गदर्शन लाभले आहे.


