वादळी वाऱ्याच्या पावसामुळे नसरापूर बाजार पेठेमध्ये शेतकरी आणि व्यापाऱ्यांचे नुकसान.
नसरापूर: गुंजवणी खोऱ्यात गेल्या आठवड्यात तीन वेळा अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला असून विजांच्या गडगडाटासह वादळी वाऱ्याच्या पावसामुळे नसरापूर आठवडे बाजारात ग्राहकांनी पाठ दाखवल्याने विक्रेत्यांनी पॅकअप केले. तर या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
रविवारी ( दि. १९ ) मे रोजी अचानक आलेल्या वादळी पावसामुळे नसरापूर बाजारातील ग्राहक व विक्रेत्यांची एकच तारांबळ उडाली होती. तसेच पाणीच पाणी झाल्याने विकण्यासाठी आलेल्या भाजीपाला, कापड दुकानदार, मत्स्य, किराणा, भांडी विक्रते, हॉटेल खाऊ विक्रेते यांचे प्रचंड नुकसान झाले. बाजारातील ताडपत्री उडाल्याने व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले. येथील रस्त्यावरील एक वृक्षाचा भाग रस्त्यावर कोसळल्याने वाहतूकही विस्कळित झाली होती.
सायंकाळी साडेपाच वाजेनंतर अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह पावसाचा फटका शेतकऱ्यांसह बाजारहाट करणाऱ्या नागरिकांना बसला आहे. विजांच्या कडकडाटासह सुरू झालेला पाऊस साडेसात वाजेपर्यंत थैमान घालत होता. जवळपास दीड तास झालेल्या तुफान वादळी पावसाने नसरापूर, कामथडी, कापूरहोळ, किकवी, सारोळा, हातवे, तांबड यासह आदी गावात पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला होता. यामुळे भाजीपाला आणि फळबागांचे मोठे नुकसान झाले असून उन्हाळी भुईमूग, जनावरांसाठी साठवण करून चारा आदी पिकांचे मोठे नुकसान झाले असून झाडावरून उतरविण्यासाठी तयार असलेला आंबा वादळी वाऱ्यामुळे पूर्णपणे तुटून पडले आहे.


