आपत्ती निवारण उपाययोजनांबाबत पालकमंत्री मा. ना. शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा प्रशासनाची आढावा बैठक संपन्न.
सातारा प्रतिनिधी : दिलीप वाघमारे
अतिवृष्टी व दरडप्रवण क्षेत्रात करावयाच्या उपायोजनांबाबत आज सोमवार दि. २४ जून रोजी पालकमंत्री मा. ना. शंभूराज देसाई यांनी जिल्हाधिकारी कार्यालय येथे आढावा बैठक घेतली. यावेळी मान्सून कालावधीत आपत्ती निवारणाच्या दृष्टीने उपाययोजनांबाबत त्यांनी प्रशासनाला आवश्यक त्या सूचना दिल्या.
यावेळी जिल्हा प्रशासनाकडून यासंदर्भात करण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा आढावा मा. ना. शंभूराज देसाई यांनी घेतला. संभाव्य आपत्ती परिस्थिती हाताळण्यासाठी १ जुलैपासून एनडीआरएफचे पथक सातारा जिल्ह्यात दाखल होणार आहे. त्याचबरोबर जिल्हा प्रशासन व एनडीआरएफमार्फत पूरप्रवण व दरडप्रवण तालुक्यांमध्ये शोध व बचाव प्रशिक्षण कार्यक्रम तसेच साहित्याची चाचणी घेण्यात आली आहे. दरड कोसळून रस्ते वाहतूक विस्कळीत होऊ नये यासाठी मेढा-महाबळेश्वर घाट, पसरणी घाट, चिपळून-कराड मार्ग, सज्जनगड-ठोसेघर मार्ग, महाबळेश्वर-पोलादपूर मार्ग व शेंद्रे ते बामणोली मार्गावर जेसीबी, पोकलेन, क्रेन व डंपर इत्यादी वाहने सज्ज ठेवण्यात आलेली आहेत. तसेच गावांमध्ये पूर किंवा दरडी कोसळल्या तर तेथील नागरिकांची विविध शाळांमध्ये राहण्याची सोय करण्यात आली असून या शाळांमध्ये औषधे, पिण्याचे पाणी, अन्नधान्य, वीज यांसह सर्व सुविधा सज्ज ठेवण्यात आलेल्या आहेत.
मान्सून कालावधीत आपत्ती निवारणासाठी जिल्हा प्रशासन सज्ज आहे. आपत्ती उद्भवल्यास तेथील नागरिकांपर्यंत प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी लवकरात लवकर पोहोचून मदत करतील, असा विश्वास मा. ना. शंभूराज देसाई साहेबांनी यावेळी व्यक्त केला. तसेच डोंगरी आणि पूरप्रवण क्षेत्रातील नागरिकांनी मान्सून कालावधीत सतर्क राहावे, असे आवाहनही मा. ना. शंभूराज देसाई साहेबांनी यानिमित्ताने केले आहे.
या बैठकीस जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक समीर शेख, उपवनसंरक्षक आदिती भारद्वाज, अपर जिल्हाधिकारी जीवन गलांडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.


