शैक्षणिक पालखी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सारोळे! जि.प.शाळेत दिंडी सोहळा मोठया उत्साहात साजरा.
सारोळे : वारकऱ्यांच्या वेशभूषा तील लहान मुले, मुली पालखी मिरवणूक आणि विठू नामाचा गजर अशा वातावरणात जिल्हा परिषद शाळा सारोळे यांचा विठू माऊलीचा दिंडी सोहळा सारोळे गावातील विठ्ठल मंदिरा शेजारी रंगला.
महाराष्ट्रातला सर्वात मोठया प्रमाणात साजरा केलेला सांस्कृतिक सोहळा आणि धार्मिक परंपरेचा मान हा पालख्यांचा असतो. भागवत संप्रदायाच्या परंपरेला अनुसरून दरवर्षी ज्ञानेश्वर आणि तुकाराम यांच्या पालख्या अनुक्रमे आळंदी व देहू येथून निघून पंढरपूरला जातात. आषाढी एकादशीला – म्हणजेच आषाढ शुध्द एकादशीला सर्व भक्तगण पंढरपूरला विठोबा-रखुमाईचे दर्शन घेतात आणि द्वादशीला आपापल्या गावी परततात.
पंढरीची वारी म्हणजेच आपल्या महाराष्ट्राचे अध्यात्मिक सांस्कृतिक वैभव. लाखो वारकरी ज्ञानेश्वर महाराज व तुकाराम महाराज यांच्या पालखी बरोबर मुखी विठ्ठल नामघोष करीत उत्साहाने, आनंदाने शिस्तीत वारीत सामील होतात. हा भक्तिरसाचा वारसा विद्यार्थिनींनी मधे रुजविण्यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सारोळे ता. भोर याठिकाणी पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. एरव्ही शाळेच्या गणवेशात असलेली लहान मुले मुली आज मात्र पांढरा कुर्ता आणि डोक्यावर टोपी, कपाळी बुक्का, डोक्यावर तुळस घेऊन वारकऱ्यांचे पोशाख परिधान केले होते.
ज्ञान मंदिरात हरिनामाचा गजर
“विठ्ठल नामाची शाळा भरली, शाळा शिकताना तहानभूक हरली ” या अभंगाप्रमाणे विठ्ठल रखुमाई च्या भक्तीत यावेळी ज्ञान मंदिरात भोळ्या विठ्ठलाच्या हरिनामाचा गजर झाला. हे बघून हे जणू खरंच पंढरपूरच्या वारीला निघाल्याचा भास होत होता. मला अवघे जिल्हा परिषद शाळा सारोळे येथील मुले दिंडी सोहळ्याच्या भक्तीरसात तल्लीन झाल्याचे पाहायला मिळाले. वारकरी दिंडी,वृक्षदिंडी, पर्यावरण दिंडी अशा विविध दिंड्यांचे आयोजन करण्यात आले होते. या दिंडी कार्यक्रमासाठी सारोळे शाळेचे मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख विजयकुमार थोपटे, उपशिक्षक संदीप सावंत, सहशिक्षिका वंदना कोरडे, जया कांचन, छाया हिंगे, अर्चना वानखेडे, जयश्री शिर्के, कांचन थोपटे आदी शिक्षक वृंद आणि वारकरी ग्रामस्थ मंडळ सारोळे उपस्थित होते.
आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला मोठी यात्रा भरते. त्यामध्ये लाखो भाविक सहभागी होतात. लहान मुलांना यागर्दीच्या वेळी जाता येत नाही. महाराष्ट्राची संस्कृती कशा पद्धतीने असते याचा प्रत्यक्षात अनुभव या विद्यार्थ्यांना यावा यासाठी शाळेतून गावात दिंडी काढून आनंद संस्कृतीचे दर्शन घडवण्यासाठी हा दिंडी सोहळा काढण्यात आला आहे.
आनंद व संस्कृती तिचे दर्शन घडवण्यासाठी हादिंडी सोहळा
मुख्याध्यापक केंद्रप्रमुख विजयकुमार थोपटे, जिल्हा परिषद शाळा सारोळे


