लाडकी बहीण योजनेचा अर्ज मोबाईल वरून करता येणार! अर्ज कसा भरायचा याबद्दल माहिती.


 

राज्य सरकारने नुकताच ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ ही योजना सुरू केली आहे. त्यासाठी अर्ज भरण्याची प्रक्रियादेखील सुरू झाली आहे. या योजनेनुसार जुलै महिन्यापासून राज्यातील महिलांना प्रतिमहिना १५०० रुपये मानधन दिले जाणार आहे. मात्र, यासाठी अर्ज करताना अनेक रांगेत उभे राहून महिलांना त्रास सहन करावा लागतो आहे. अनेक ठिकाणी तलाठीदेखील महिलांशी अरेरावी करत असल्याची प्रकरणं पुढे आली आहे.

महत्त्वाचे म्हणजे या योजनेसाठी अर्ज करणाऱ्या महिलांसाठी आता दिलासादायक बातमी आली आहे. लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी आता थेट मोबाईवरून अर्ज करता येणार आहे. त्यामुळे महिलांचा त्रास कमी होण्याची शक्यता आहे.

मोबाईल वरून अर्ज कसा भरायचा याबद्दल माहिती.

१) सर्वप्रथम गुगल प्ले-स्टोअरवरून ‘नारीशक्ती दूत’ हे ॲप डाऊनलोड करा. त्यानंतर ज्या महिलेचा अर्ज भरायचा आहे, त्या महिलेचा मोबाईल क्रमांक टाकून लॉगीन करा.

२) ‘Accept Term and Condition’ वर क्लिक करा आणि स्वीकारा या पर्यायावर क्लिक करा.

३) ज्या मोबईल क्रमांकाने तुम्ही लॉगीन केलं, त्या मोबाईल क्रमांकावर तुम्हाला ओटीपी प्राप्त होईल. तो ओटीपी दिलेल्या बॉक्समध्ये टाकून ‘व्हेरिफाय ओटीपी’ या पर्यायावर क्लिक करा.

४) त्यानंतर ‘तुम्हाला प्रोफाईल अपडेट करा’ असा संदेश येईल. तिथे ‘आपली माहिती भरण्यासाठी येथे क्लिक करा’, या पर्यायावर क्लिक करा.

५) प्रोफाईल अपडेट करताना, तुमचं पूर्ण नाव, ईमेल आयडी (पर्यायी), जिल्हा, तालुका, नारीशक्तीचा प्रकार अपडेट करा.

६) प्रोफाईल अपडेट केल्यानंतर खाली ‘नारीशक्ती दूत’ या पर्यायावर क्लिक करा..

७) ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ या पर्यायावर क्लिक करा.

८) महिलेचे संपू्र्ण नाव (आधार कार्डप्रमाणे), पतीचे किंवा वडिलांचे नाव, जन्म तारीख, जन्माचे ठिकाण (गाव/ शहर) पीन कोड, पूर्ण पत्ता, अर्जदार महिलेचा मोबाईल क्रमांक, आधार क्रमांक, शासनाच्या इतर योजनांचा लाभ घेत आहे का?, वैवाहिक स्थिती आणि बॅंक खात्याच तपशील भरा.

९) संपूर्ण माहिती भरल्यानंतर आधार कार्ड, जन्म प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला/रेशन कार्ड, अर्जदाराचे हमीपत्र, (डाऊनलोड करून प्रिंट काढून त्यावर सही करा आणि पुन्हा अपलोड करा) आणि बॅंकेच्या पासबूकच्या फोटो आणि अर्जदाराचा फोटो अपलोड करा, आणि खाली ‘जतन करा’. या पर्यायावर क्लिक करा.

१०) तुम्ही भरलेली माहिती योग्य आहे की नाही, तपासून घ्या आणि ‘अर्ज दाखल करा’, यापर्यायावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला ओटीपी येईल, तो ओटीपी भरून अर्ज दाखल करा.

१२) केलेले अर्ज या पर्यायावर क्लिक करून तुम्ही तुमच्या अर्जाची सद्यस्थिती जाणून घेऊ शकता.

अर्ज करण्यासाठी इतर पर्याय काय?

या योजनेसाठी तुम्ही ऑनलाईन बरोबरच ऑफलाईन पद्धतीनेही अर्ज भरू शकता. त्यासाठी ग्रामीण भागातील महिलांनी ग्रामसेवक किंवा अंगणवाडी सेविकांकडे नोंदणी करावी लागेल. तर शहरी भागातील महिलांना वॉर्ड ऑफिसरकडे नोंदणी करावी. या योजनेसाठी अर्ज स्वीकारण्यास १ जुलैपासून सुरुवात झाली असून ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज संकलित करण्यात येणार आहेत.

योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रता काय?

या योजनेचा लाभ फक्त महाराष्ट्रातील महिलांना घेता येणार आहे. त्यासाठी २१ ते ६० वयोगटातील महिला अर्ज करू शकतात. या योजनेचा लाभ घेण्याकरता कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न २.५ लाखांपेक्षा कमी असणं आवश्यक आहे. महत्त्वाचे म्हणजे इन्कम टॅक्स भरणाऱ्या महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही. तसेच सरकारी नोकरी करणाऱ्या महिलांनाही या योजनेचा लाभ घेता येणार नाही. सरकारी योजनेतून मानधन घेणाऱ्या महिलांनाही ही योजना लागू नाही.

या योजनेची कागदपत्रे कोणती

आधार कार्ड, मूळ निवासी प्रमाणपत्र किंवा मतदार ओळखपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्म दाखला, पिवळे किंवा केशरी कार्ड, बँकेचे पासबूक , मोबाईल क्रमांक, उत्पन्नाचा दाखला किंवा पिवळे किंवा केशरी शिधापत्रिका , पासपोर्ट साईज फोटो, लाडकी बहीण योजनेचा फॉर्म.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!