वारकऱ्यांची सुरक्षा आणि आरोग्याच्यादृष्टीने आवश्यक सुविधा कराव्यात! विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार
लोणंद प्रतिनिधी : दिलीप वाघमारे
लोणंद दि. ५ : येथे संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या आगमनाच्या पार्श्वभुमीवर विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांनी लोणंद पालखीतळाला भेट देत तयारीबाबत समाधान व्यक्त करत वारक्यांची सुरक्षा आणि आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक सुविधा करण्याबाबत सूचना दिल्या.
लोणंद नगरपंचायतीकडून आगामी पालखी सोहळ्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांनी आज लोणंद पालखी तळाला भेट देवून त्याबाबतचा आढावा घेतला , यावेळी लोणंद नगरपंचायतचे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, नगरसेवक तसेच मुख्याधीकारी दत्तात्रय गायकवाड तसेच प्रांत राजेंद्रकुमार जाधव, प्रांत सचिन ढोले, तहसीलदार अजित पाटील, उपविभागीय पोलीस अधिक्षक राहुल धस व इतर अधिकारी होते.
यावेळेस वारकऱ्यांची सुरक्षा आणि आरोग्याच्यादृष्टीने आवश्यक सुविधा करण्यात याव्यात. मुक्कामाच्यादृष्टीने पिण्याचे पाणी आणि फिरत्या स्वच्छतागृहांची पुरेशा प्रमाणात व्यवस्था करावी. स्वच्छतागृहांची नियमित स्वच्छता होईल याकडे लक्ष द्यावे. पुणे जिल्ह्यातील पालखी मुक्काम आणि विसाव्याच्या ठिकाणी पालखी प्रस्थानानंतर त्वरीत स्वच्छता होत असून प्रत्येक तळावर अशीच व्यवस्था ठेवावी आणि त्यासाठी आवश्यक प्रमाणात स्वच्छता कर्मचारी नेमावेत, असे निर्देश विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिले.
“विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार- पालखी सोहळा दरवर्षीच आपण खूप चांगल्या प्रकारे पार पाडतो. याही वर्षी आपण पुर्ण तयारी केली आहे. विशेषतः लोणंद पालखी तळावरील नियोजन मागील वर्षी केलेल्या सूचनांनुसार अतिशय छान तयारी करण्यात आली आहे. प्रशासनाच्या सर्वच विभागांकडून चांगला समन्वय ठेवून योग्य नियोजन करण्यात आले आहे. तसेच लोणंदवासियांनी ही वारी “स्वच्छ, निर्मल व आनंददायी” होण्यासाठी प्रयत्न करून योगदान द्यावे.”


