भोर तालुक्यातील बारे गावावर चोरांची नजर! नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण.
कार्यकारी संपादक : सागर खुडे
भोर तालुक्यातील वेळवंड खोऱ्यातील बारे खुर्द परिसरातील काही ठराविक घरांवर रात्रीच्यावेळी अज्ञातांनी दगडफेक करून दरवाजांना बाहेरून कड्या घालण्याचे प्रकार काही दिवसांपासून सुरू आहेत.
तेथील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे सुरक्षितता मिळावी, यासाठी ग्रामपंचायत बारे खुर्दच्या वतीने भोरचे तहसीलदार व पोलिस निरीक्षक यांना सोमवारी (ता. २२) निवेदन दिले आहे. निवेदन देताना सरपंच सविता गायकवाड, उपसरपंच दीपक खुटवड, सदस्य सुरेश खुटवड व भारती गायकवाड उपस्थित होते.
भोर तालुक्यात गेल्या काही दिवसांपूर्वी ड्रोन घिरट्या घालत होते. त्याच काळात बारे गावच्या हद्दीतही ड्रोन फिरत होते. दरम्यान २९ जून रोजी रात्री सुमारे एक वाजता गावात एक मोटार न थांबता फिरून गेली. त्यानंतर थोड्या वेळात ६ ते ७ अनोळखी व्यक्ती हातामध्ये कोयते घेऊन येऊन दोन घराच्या कड्या वाजविल्या, त्यामुळे गावामध्ये आरडा ओरडा झाल्याने ग्रामस्थ जमा झाले. गावातील लोकांनी त्यांचा पाठलाग केला. परंतु, ते रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले. त्यानंतर ग्रामस्थांनी दोन तास गस्त घातली होती. परंतु, कोणीही आढळून आले नाही. त्यानंतर गावामध्ये दररोज रात्री अकरानंतर घरावर दगडफेक होत होती. त्यानंतर भयभीत झालेल्या ग्रामस्थांनी वरील आशयाचे पत्र २ जुलै रोजी भोर पोलिसांना दिले होते. मात्र, अजूनही ठराविक घरांवर दगड फेक तसेच दरवाजांना कड्या घातल्या जात आहेत. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या वतीने सोमवारी (ता.२२) तहसीलदार व पोलिस स्टेशनला निवेदन देऊन सुरक्षिततेची मागणी केली आहे. ग्रामीण भागातल्या गावातून सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे गरजेचे आहे. बारे गावच्या पोलिस पाटलांना सांगून संपूर्ण गावाची बैठक घेऊन पुढील निर्णय घेण्यात येईल, पोलिसांकडून सांगितले.