न्हावी शाळेच्या उपक्रमशील शिक्षिका श्रीम रुपाली दिलिप पिसाळ( चाचर) यांना सुमतीबाई गोरे ट्रस्टचा राज्यस्तरीय उपक्रमशील शिक्षिका पुरस्कार जाहीर
सारोळे : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा न्हावी शाळेच्या उपक्रमशील शिक्षिका श्रीम रुपाली दिलिप पिसाळ( चाचर) यांना सुमतीबाई गोरे ट्रस्टचा राज्यस्तरीय उपक्रमशील शिक्षिका पुरस्कार नुकताच जाहीर झाला आहे.
आदर्श शिक्षिका श्रीम.रुपाली पिसाळ(चाचर) यांनी नोकरीच्या सुरुवातीच्या काळात ठाणे जिल्ह्यातील तलासरी(डोंगरपाडा),
शहापूर(उंभ्रई)तालुक्यात आदिवासी क्षेत्रात काम केले असून आदिवासी विध्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले, शिकवले,टिकवले.आजही त्यांचे विद्यार्थी विविध क्षेत्रात चांगले काम करत आहेत.टाकावूपासून टिकावू वस्तू निर्मितीमध्ये त्यांचा हातखंडा आहे.
पालक व लोकसहभागातून शाळा आणि गुणवत्तापूर्ण विद्यार्थी विकास हे त्यांचे ब्रीद आहे.
एक शांत,संयमी, उपक्रमशील,समाजप्रिय, विध्यार्थीप्रिय शिक्षिका म्हणून गावागावात त्यांनी नावलौकिक मिळवला आहे.त्यांनी पुणे जिल्ह्यात पुरंदर तालुक्यातील दौंडज या गावी नोकरीची 13 वर्षे ज्ञानदानाचे पवित्र काम करून गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा ठसा उमटवला.नवोदय, शिष्यवृत्तीसारख्या परीक्षेत त्यांचे विद्यार्थी चमकले.सामाजिक क्षेत्रातील त्यांचे काम सुद्धा कौतुकास्पद आहे.पती अनिल चाचर यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारी पत्नी व असे दांपत्य विरळच.
वंचिताचे शिक्षण,स्थलांतरित मजुरांच्या मुलांच्या शिक्षणासाठी बाईंच्या डोळ्यात टचकन पाणी येते.याच संवेदनशीलतेने त्या जि प प्राथ शाळा न्हावी शाळेत काम करत आहेत.गतवर्षीच त्यांच्या विध्यार्थीनीचा आलेला जिल्ह्यात प्रथम क्रमांक परिसरातील गावागावात कौतुकाचा विषय बनला होता.
अचानक दिव्यांगत्व आलेल्या मुलीला केलेली मदत असो अथवा पारधी कुटुंबातील मुलाला स्वखर्चातून पोलीस अकॅडेमीमध्ये ठेवून पोलीस बनवण्यात आलेले यश असो, विध्यार्थिनींसाठी राबवलेली शुभमंगल ठेव योजना,विध्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, वह्या वाटप अशा कितीतरी प्रेरणादायी उपक्रमातून त्यांनी विद्यार्थी घडवले.
सुमतीबाई गोरे ट्रस्ट पुरस्कार समारंभ मा.श्री दत्तात्रय वारे,वाबळेवाडी (झिरो एनर्जी शाळा)यांच्या प्रमुख उपस्थितीत व प्रसिद्ध लेखिका इंदुमती जोंधळे यांच्या अध्यक्षतेखाली दि.११/८/२४ रोजी पुणे येथे संपन्न होणार आहे.