हरिश्चंद्री (ता.भोर)गावाच्या उड्डाण पुलाच्या कामाला २ ऑक्टोंबर २०२४ रोजी सुरूवात होणार.
कार्यकारी संपादक :सागर खुडे
कापूरहोळ, दि. २३ (वार्ताहर) – पुणे सातारा महामार्गावर हरिश्चंद्री गावच्या हद्दीतील महामार्ग मृत्यूचा सापळा ठरला आहे. या ठिकाणी अपघात होऊन अनेकांना आपला जीव गमावावा लागला. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ वरील हरिश्चंद्री फाट्यावर अखेर उड्डाण पुलाच्या कामाला २ ऑक्टोंबर २०२४ रोजी सुरुवात होणार असल्याचे पत्र राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण पश्चिम महाराष्ट्राचे अधिकारी संजय कदम व कॉन्ट्रॅक्टर निखिल कंतट्रक्शन यांनी हरिश्चंद्री ग्रामस्थांना दिले आहे.
पुणे सातारा राष्ट्रीय महामार्ग हा हरिश्चंद्री गावाच्या मधून गेल्यामुळे दळणवळणसाठी मोठी अडचण झाली होती. रस्त्यावरून शेतीच्या मशागतीच्या कामासाठी अलीकडे पलीकडे जाणे येणे, शेती मसागत करण्यासाठी लागणारी औजारे महामार्गाच्या पलीकडील बाजूला नेणे, गुरांना चाऱ्यासाठी रस्त्यापलीकडे जाणेसुधा अवघड झाले होते. गावातील नागरिकांना बाजारपेठेत जाणे लहान मूलांना शाळेत जाण्यासाठी महामार्गावरूनच जीव मुठीत घेऊन वावरावे लागत आहे.
हरिश्चंद्री गावातील ७ ते ८ नागरिकांचा या ठिकाणी अपघात होऊन त्यांचे संसार उद्धवस्त झाले आहेत. या गोष्टींना कंटाळून हरिश्चंद्री ग्रामस्थांनी गेली ८ ते ९ वर्षे आंदोलनाचा पवित्रा घेत उपोषण, शोले स्टाईल पाणी टाकीवर आंदोलन, रास्ता रोको, आत्मदहन अशी वेगवेगळ्या प्रकारची आंदोलने केली. अखेर आंदोलनाला यश मिळाल्याने हरिश्चंद्री ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला.
त्याच बरोबर हरिश्चंद्री ग्रामस्थांनी याआधी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांना ब्रीज व्यतिरिक्त ज्या मागण्या केल्या होत्या त्या जर मागण्या २ ऑक्टोंबर पर्यंत पूर्ण नाही केल्या तर हरिश्चंद्री ग्रामस्थ पुन्हा एकदा आंदोलनाचा पवित्रा घेणार असल्याचे ग्रामस्थांनी सोशल मीडियाशी बोलताना सांगितले.
अखेर हरिश्चंद्री गावाच्या उड्डाण पुलाला अखेर २ ऑक्टोंबर २०२४ रोजी सुरूवात होणार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.


