महाराष्ट्राला कर्मवीरांच्या आधुनिक विचाराची गरज डॉ. श्रीमंत कोकाटे
लोणंद- रयतेसाठी स्वराज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज होते. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांना समजले होते शिक्षणाशिवाय समाज परिवर्तन होणार नाही म्हणून त्याने स्त्री शिक्षणाला सुरुवात केली. छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांनी समाजाला समतेचा विचार दिला. कर्मवीर अण्णांनी शिक्षणाचे महत्त्व जाणले होते. शिक्षणामध्ये मोठी ताकद आहे. कर्मवीर अण्णांनी दीन-दुबळ्या, गोर-गरीब समाजातील मुलांना शिक्षित करून स्वाभिमानी जीवन जगण्याची ताकद निर्माण करून दिली. कर्मवीर अण्णा बंडखोर आणि समतावादी विचाराचे होते. गुणांवर माणसाची हुशारी ठरवता येत नाही, तर माणसाच्या कर्तव्यावर त्याची हुशारी ठरत असते. ग्रामीण भागामध्ये मोठी गुणवत्ता आहे. गुणवत्ता कोणाची मक्तेदारी नाही. प्रत्येक माणसाच्या जीवनात अनेक संकटे येत असतात, पण याच संकटांना संधी समजणे आवश्यक आहे. कर्मवीरांना रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून स्वाभिमानी, निष्ठावान, तत्वनिष्ठ, संस्कारक्षम आणि विचारवंत विद्यार्थी निर्माण केले आहेत. कर्मवीरांच्या आधुनिक विचाराची आज महाराष्ट्राला नितांत गरज आहे.विद्यार्थ्यांनी कर्मवीर अण्णांच्या विचारांची शिदोरी समाजापुढे मांडणे आवश्यक आहे. असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत इतिहास अभ्यासक व लेखक मा. डॉ.श्रीमंत कोकाटे यांनी केले.
लोणंद येथील रयत संकुलाच्या वतीने रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १३७ व्या जयंती सोहळ्यानिमित्त आयोजित समारंभ प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रयत शिक्षण संस्थाच्या उच्च शिक्षण विभागाचे सहसचिव मा. प्राचार्य डॉ. शिवलिंग मेनकुदळे होते. अध्यक्षिय मनोगत व्यक्त करताना ते म्हणाले, “कर्मवीर अण्णांनी रयत शिक्षण संस्थेचे रोपटे लावून समाजामधील अंधकार दूर करण्याचे काम केले. आज त्याचा मोठा वटवृक्ष निर्माण झाला आहे. विद्यार्थ्यांनी कर्मवीरांची वैचारिक परंपरा जपली पाहिजे. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी माणसाच्या उन्नतीसाठी रचनात्मक कार्य केले. सावित्रीबाई फुले यांनी स्त्री-उद्धाराचे व स्त्री शिक्षणाचे मोठे कार्य केले. कर्मवीर अण्णा महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज यांना आपले गुरु मानत होते. महाराष्ट्रात कर्मवीर अण्णांसारखे महापुरुष जन्माला आले नसते तर आजची महाराष्ट्राची शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक आणि वैचारिक उन्नती पहावयास मिळाली नसती. रयतेचा विद्यार्थी असणे हे अभिमानाची गोष्ट आहे. ” यावेळी व्यासपीठावर उपसंचालक भारतीय क्रिकेट नियम मंडळ सहाय्यक पोलीस उपायुक्त ( से. नि.) मा. रवींद्र डोईफोडे, जनरल बॉडी सदस्य, र.शि.सं. सातारा व आजीव सदस्य, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मा. मिलिंद माने,महाविद्यालय विकास समिती सदस्य मा. आनंदराव शेळकेपाटील , जनरल बॉडी सदस्य सौ. प्रतिभाताई शिंदे, जनरल बॉडी सदस्य, सौ. चित्राताई शहा, शालेय व्यवस्थापन समिती सदस्य मा. डॉ. अनिलराजे निंबाळकर, शालेय व्यवस्थापन समिती सदस्य मा. सुनील शहा, प्र. प्राचार्य डॉ. बाळासाहेब जाधव, नगरसेविका दिपाली शेळके , बागवान सर, प्राचार्या सौ. सुनंदा नेवसे,प्राचार्य चंद्रकांत जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
मा. रवींद्र डोईफोडे मनोगतात म्हणाले,” कर्मवीर अण्णांनी शिक्षण संस्था सुरू करून बहुजनांच्या मुलांना शिक्षित केले. कर्मवीर अण्णांनी ज्ञानाबरोबर कर्तव्याची आणि स्वावलंबनाची शिदोरी प्रत्येक विद्यार्थ्याला दिली. विद्यार्थ्यांनी आपली व्यक्तिमत्व सर्वगुणसंपन्न करणे आवश्यक आहे. रयत शिक्षण संस्था विद्यार्थ्यांना चांगले विचार आणि संस्कार देत आहे. रयत संकुलास आर्थिक शैक्षणिक व क्रीडा विभागासाठी भौतिक सुविधा व विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शनाची आवश्यक असेल त्यावेळी नेहमीच मी तत्पर राहील”
यावेळी मनोगत व्यक्त करताना मा. मिलिंद माने म्हणाले, ” कर्मवीर अण्णा आणि रयत माऊली लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांच्या त्यागावरती रयत शिक्षण संस्थेचा वटवृक्ष फुललेला दिसतो. बहुजन, दीन दलित यांच्या घरापर्यंत ज्ञानगंगा पोहोचवण्याचं काम कर्मवीर अण्णांनी रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून केले. विद्यार्थ्यांनी कर्मवीर अण्णांचा विचाराचा वारसा पुढे नेणे आवश्यक आहे. रयत शिक्षण संस्था विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षण देत आहे “.
मा. आनंदराव शेळके पाटील, मा. सुरेंद्र बोडरे यांनी मनोगते व्यक्त केली.
या समारंभाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय श्री. चंद्रकांत जाधव यांनी करून दिला. यावेळी मान्यवरांचे स्वागत प्र. प्राचार्य डॉ. बाळासाहेब जाधव यांनी केले. सर्व विद्यालय व महाविद्यालय विकास समिती सदस्य, शिक्षक व शिक्षकेत्तर सेवकवर्ग, विद्यार्थी व विद्यार्थिनी, रयत संकुल, लोणंद आणि लोणंद पंचक्रोशीतील ग्रामस्थ व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. एम. डी. नायकू व प्रा. सौ. आर. व्ही. मोरे यांनी केले व आलेल्या मान्यवरांचे आभार प्राचार्या सौ. सुनंदा नेवसे यांनी मानले.