पिंपरीत 400 एकर मध्ये होणार महाराष्ट्राचा 58 वा निरंकारी संत समागम
प्रतिनिधी: शंकर माने
पुणे 17 जानेवारी पिंपरी: महाराष्ट्राचा 58वा निरंकारी संत समागम सुरु होण्यास अवघे काही दिवस उरले असल्याने समागमाच्या पूर्वतयारीमध्ये लागलेले निरंकारी भाविक भक्तगण समागम स्थळ समतल व सुंदर बनविण्यासाठी त्यामधील प्रत्येक व्यवस्थेला अंतिम रुप देत आहेत. समागमाच्या पूर्वतयारीमध्ये पुणे झोनसह संपूर्ण महाराष्ट्रातील हजारो सेवादल स्वयंसेवक आणि भाविक भक्तगण सातत्याने आपल्या निष्काम सेवा अर्पण करत आहेत. पिंपरीतील मिलिटरी डेअरी फार्मच्या सुमारे 400 एकरच्या विस्तीर्ण मैदानात शुक्रवार, दि.24 जानेवारी 2025 पासून हा तीन दिवसीय संत समागम सुरू होत असून, त्याची सांगता 26 जानेवारी 2025 रोजी होणार आहे. मुख्य सत्संग कार्यक्रम दररोज दुपारी 2 वाजता सुरू होईल ज्यामध्ये अनेक वक्ते, गीतकार, कवी सद्गुरु आणि ईश्वराप्रती आपल्या मनातील भावना व्यक्त करतील. शेवटी रात्री ८ वाजल्यापासून सर्वांना सद्गुरु माता सुदीक्षा जी महाराज यांचा पवित्र आशीर्वाद लाभणार आहे.
मागील एक महिन्यांपासून महाराष्ट्रा व्यतिरिक्त इतर राज्यांतून निरंकारी भक्तगणांनी समागम स्थळांवर येऊन आपल्या निष्काम सेवांच्या माध्यमातून समागम स्थळाला एका सुंदर नगरीच्या रुपात परिवर्तित केले आहे. सर्व श्रद्धाळू ज्या उत्साहाने, आवडीने, भक्तिभावाने, मर्यादा व अनुशासनाचे पालन करत आपल्या सेवा निभावत आहेत ते पाहून जनसामान्य अत्यंत प्रभावित आहेत. समागम स्थळाचे हे अनुपम दृश्य आजूबाजूने जाणाऱ्या वाटसरूंना आणि स्थानिक नागरिकांना आकर्षण व उत्सुकतेचे केंद्र बनून राहिले आहे.
मानवतेच्या कल्याणासाठी आयोजित केलेल्या या संत समागमाचे साक्षी बनण्यासाठी समस्त भाविकांना व निरंकारी भक्तगणांना नुक्कड नाटक, बॅनर तसेच पुण्याच्या कानाकोपऱ्यात खुल्या प्रांगणांमध्ये सत्संगच्या माध्यमातून सादर आमंत्रित केले जात आहे ज्यायोगे त्यांनी या संत समागमामध्ये सहभागी होऊन आपले जीवन सार्थक करावे.


