स्थानिक स्वराज्य संस्थात येणार गुंडाराज? मोक्कातील आरोपींच्या हालचाली झाल्या गतीमान एसपी,कलेक्टरपुढे मोक्कातील आरोपींना स्थानबध्दतेचे आवाहन
संपादक दिलीप वाघमारे
जिल्ह्याने देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात योगदान दिले आहे. त्यामुळे जिल्हा महाराष्ट्राच्या राजकारणातही अग्रेसर राहिला आहे. स्वातंत्र्यानंतर यशवंतराव चव्हाण, किसन वीर यांच्या विचाराने प्रशासनाला बरोबर घेवून सकारात्मक विचाराने जिल्हा विकास पटलावर राहिला. पण आज या जिल्ह्यात स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीमध्ये गुंडाराज येण्याच्या हालचाली गतीमान झाल्या आहेत. मोक्कामधील अनेक जणांनी याबाबत आपल्या नेत्यांपुढे साकडेही घातले आहेत. नेत्यांनी सकारात्मक भूमिका न घेतल्यास स्वत:च निवडणुकीला सामोरे जाण्याचे मनसुबे सुरु झाले आहेत. त्यामुळे या गुंडाराजला लगाम घालण्याचे आवाहन जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस प्रमुख यांच्यापुढे मोठे राहणार आहे.
राज्यातील महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती यांची निवडणुक प्रलंबित आहे. त्या येत्या चार महिन्यात घेण्याबाबत घेण्याचे आदेश सुप्रिम कोर्टाने दिले आहेत. याच दरम्यान या निवडणुकांमधून मोक्कातील आरोपी चंचुप्रवेश करत किमान ३0 टक्के गुंडाराज येतील, असे समाजामधून संकेत मिळत आहेत.
कधीकाळी राजकारणात मुल्य जपली जात असत. पण १९९0 च्या दशकापासून महाराष्ट्रातील राजकारणाचे वारे वेगळ्या दिशेने फिरु लागलं. महाराष्ट्राच्या राजकारणात गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींचा शिरकाव सुरु होवू लागला आहे. तर पुण्यामध्ये २000 पासून जेव्हा जमिनींचे भाव वाढले तसा पुणे शहराच्या राजकारणात गुन्हेगारीचा उदय झाला. तसंच साताऱ्यात एमआयडीसी सुरु झाली, तेव्हापासून गुन्हेगारीचा उदय झाला. यानंतर मजल-दरमजल करत आता हे गुन्हेगार मोक्कातून बाहेर पडत आता राजकारणात स्थिरावण्याचा विचार करु लागले आहेत.
साताऱ्यासह जिल्हाभरात वारेमाप बेकायदेशीर जुगार अड्डे सुरु आहेत. यावर नजर ठेवून येणाऱ्या निवडणुकीत पैसा उपलब्ध होण्याच्या दृष्टीने गुंडानी आपले काम सुरु केले आहे. त्यामुळे अशा गुंडाना एमपीडी करुन एक वर्षासाठी स्थानबध्द करणे सुरक्षित साताऱ्यासाठी अत्यंत गरजेचे राहणार आहे. यासाठी जिल्हाधिकारी संतोष पाटील, जिल्हा पोलीस अधिक्षक तुषार दोशी यांचा पुढाकार जिल्ह्याच्या दृष्टीने महत्वाचा राहणार आहे. कारण या दोन्ही विभागाकडे या मोक्कातील आरोपींची कुंडलीच माहित आहे. वेळीच भूमिका न घेतल्यास निवडणुकीनंतर ३0 टक्के गुंडाराज आल्यानंतर ते म्हणतील तसंच प्रशासनाला वागावे लागणार आहे.
निवडणुकीनंतर झेडपीचे सीईओंची भूमिका या गुंडाराजला न पटल्यास ते ठराव घेवून राज्यसरकारला पाठवू शकतात. त्यावेळी राज्यसरकारला कायद्यानुसार जिल्ह्याचा सीईओ बदलावाच लागेल. मोक्कातील लोकांनी पुढे मजल-दरमजल करत मंत्रीपदाला गवसनी घातली तर जिल्ह्याचे एसपी अन जिल्हाधिकारी भविष्यात यांच्याच विचाराचे होवू शकतात. यासाठी जिल्ह्यातील मोक्कामधील लोकांची हालचाल ओळखून वेळीच शिवधनुष्य एसपी आणि जिल्हाप्रशासनाने हातात घेतले. तर प्रशासनासह जिल्हाही सुरक्षित राहणार आहे.
जिल्ह्यात यापूर्वी यशवंतराव चव्हाण, किसन वीर यांच्या माध्यमातुन जिल्ह्याचे विकासात्मक राजकारण चालायचे. पण आज गुंडाराज या निवडणुकीत येण्याच्या हालचालीने विशेषत: जिल्हा परिषदेत यशवंतराव, किसन वीर यांच्या विचारांची जिल्हा परिषदेची परंपरा मोडकळीस येणार आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात ३0 टक्के गुंडाराज आहे. तोच पॅटर्न स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये विशेषत: झेडपीच्या निवडणुकीत पहायला मिळण्याचे संकेत समाजमाध्यमातून मिळाले आहेत. आज महाराष्ट्राच्या राजकारणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माधव पॅटर्न आणलेला आहे. हा पॅटर्न म्हणजे माळी, धनगर, वंजारी होय. तो आता यापुढेही जोडूनच राहणार असल्याने झेडपीच्या निवडणुकीत हा प्रयोग लोकशाहीला धोकादायक ठरण्याचे संकेत मिळत आहेत.
जिल्ह्यातील गेल्या दहा वर्षातील स्थिती पाहता विचार करण्यासारखीच आहे. राजकीय लोकांकडून यामध्ये गुन्हेगारीचा शिरकाव होवू लागला आहे. विशेषत: सातारा शहर व उपनगरांचा वरचा क्रमांक लागत आहे. आता हीच री अन्य तालुक्यानेही ओढण्याचे ठरवले आहे. आतापर्यंत नेत्यांच्या आदेशाने मोक्कामधील लोक राजाश्रय मिळवत पुढे जाणारे आता स्वत:च निवडणुकीला सामोरे जाण्याचा विचार करु लागले आहेत. त्या अनुषंगाने जुगार, मटका खेळणाऱ्यांकडून दुप्पट हप्ता वसुलीचक्र आता गतीमान करण्यात आले आहे.
२0११ मध्ये यापैकी एक गुंडाने तर निवडणुकीला पैसे कमी पडतील म्हणून पोलिसांच्याकडे सोरट जुगार हा राजवाड्यावर कागदाचा पट मांडण्यासाठी परवानगी मागितली होती. पण परवानगी मिळाली नाही. पण अन्य मार्गातून पैसे मिळवून सत्तेच्या समिकरणांचा कल ओळखत झेडपीत चंचुप्रवेश केला. यानंतर कधी इकडे तर कधी तिकडे करत राजकारणात स्थिर झाला. आज गुंडगिरी व्हाया प्रवास करताना कोट्यावधींची मालमत्ता जमवली आहे. आता मागील इतिहासाला उजाळा देताना मागासवर्गीयांच एकीकरण मोक्कातील लोकांनी सुरु केले. त्यामुळे गुंड प्रवृत्तीचे लोक यापुढे राखीव जागांच्या माध्यमातुन पुन्हा पुढे येणार असच दिसतंय. निवडणुकीत आरक्षणाच्या जागेत गुंडाला स्थान मिळाले नाही तर त्यांच्या पत्नीला उतरवले जाणार आहे. त्यामुळे यापुढे प्रशासनाला काम करणे कठीण होवून जाणार आहे. मोक्कातील लोकांची शाळा हाताच्या बोटावर असणारे गुंड भविष्यात प्रशासनाला तुमची शाळा नाय चालणार आमचीच शाळा चालेल असे सांगितले तर नवल वाटायला नको.
……………………………
*एमपीडी कायदा सक्रिय होणे गरजेचे*
एमपीडी कायदा अधिक सक्रिय होणे गरजेचे आहे. एमपीडी म्हणजे महाराष्ट्रातील धोकादायक व्यक्तींना स्थानबध्द करणे होय. साताऱ्यात आणि कराडात काही वर्षापूर्वी जसा हा कायदा राबवला तसाच आता पुन्हा राबवण्याची गरज निर्माण झाली आहे. हे कायदे वेळीच न राबवल्यास येणाऱ्या झेडपी, पंचायत समितीच्या निवडणुकीत असेच चेहरे दिसले तर नवल वाटायला नको. निवडणुक जवळ आल्यामुळे जुगार, मटका, टोलनाके यामधून वारेमाप हप्ता मोक्कातील सुटून आलेले आरोपी मागू लागल्याचे सध्याचे वास्तव आहे.
……………………………..
*गुप्त वार्ता विभाग, पोलिस जिल्हा विशेष शाखा करतेय काय?*
साताऱ्यासह जिल्ह्यामध्ये अलिकडे तर आता मोक्कातून सुटून आलेल्या लोकांच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणीत उभे राहण्यासाठी हालचाली गतीमान झाल्या आहेत. यासाठी गुन्हेगारी गुप्त वार्ता विभाग पोलिसांचा नेमकं काय करत आहे. याचबरोबर आगामी निवडणूकीत मोक्कामधील आरोपी हे झेडपीच्या निवडणुकीत किती उभे राहणार आहेत? याशिवाय निवडणुक लढवण्यासाठी कोठून पैसा उपलब्ध करत आहेत. याबाबत पोलिसांची जिल्हा विशेष शाखा नेमंक काय करत आहे, हे पाहणे औतसुक्याचे ठरणार आहे.
…………………………….
*सरकारी वकीलांच्या नियुक्त्या देवूनही त्या प्रलंबित*
आज एमपीएस्सीच्या माध्यमातून निवड झालेल्या वकीलांच्या नियुक्त्याही दिल्या जातात. पण त्यांना प्रत्यक्षात कामच करु दिले जात नाहीत. त्यामुळे परंपरागत जुन्याच वकीलांच्याकडून सत्ताधारी लोकप्रतिनिधी काम करुन घेत आहेत. आजच्या या व्यवस्थेमुळे आज सर्वोच्च न्यायालयात लोकप्रतिनिधींच्या गुन्ह्याच्या अहवालाचे खोटे रिपोर्ट दिले जातात, हे राज्याचे दुर्देव आहे.
……………………………..
*गुंडाना स्थानबध्दतेसाठी एसपींची भूमिका महत्वाची*
साताऱ्यासह जिल्हाभरात बेकायदेशीर जुगार अड्डे सुरु आहेत. यावर नजर ठेवून काम करणारे गुंडाना एमपीडी करुन एक वर्षासाठी स्थानबध्द करणे गरजेचे आहे. यासाठी जिल्हाधिकारी संतोष पाटील, जिल्हा पोलीस अधिक्षक तुषार दोशी यांचा पुढाकार जिल्ह्याच्या दृष्टीने महत्वाचा राहणार आहे.
………………………..
*राजकीय विरोधकांना संपवण्यासाठी गुंडाचा वापर*
राजकीय विरोधकांना संपविण्यासाठी गुंडाचा वापर केला जात असला तरी पुढे हे गुन्हेगार स्वत:च हळूहळू राजकारणात उतरु लागले आहेत. ज्या व्यक्तीकडे निवडून येण्याची क्षमता आहे अशा व्यक्तींना पक्षांकडून तिकीटे द्यायला सुरुवात झाली. याशिवाय राजकारणाला जे लोक पैसा कमावण्याचे माध्यम असल्याच मानतात असे लोक गुंडाचा उपयोग करुन अवैध धंदेही सुरु ठेवू लागले असल्याचं विदारक वास्तव आता पुढे येवू लागलं आहे.
…………………………….
*राजकारणात गुन्हेगारीकरण थांबवता येईल?*
राजकारणाचे गुन्हेगारीकरण रोखण्याकरीता कठोर कायदा करावाच लागेल. प्रशासकीय यंत्रणा जर बळकट झाली तर गुन्हेगारांचा राजकारणातील शिरकाव कमी होवू शकेल. प्रशासनाने सरकारी योजना या सामान्य माणसांपर्यत योग्य वेळेत पोहोचवण्यासाठी इतर मध्यस्थांची गरज भासू दिलं नाही पाहिजे. दुसरं म्हणजे. पोलीस यंत्रणेमध्ये आमुलाग्र बदल घडवणे, कायद्याचा धाक कमी झाला की गुन्हेगारी तोंड वर काढू पाहत आहेत.


