भोरमध्ये साडेतीन लाखांच्या दागिन्यांची धाडसी घरफोडी.
संपादक: मंगेश पवार
कार्यकारी संपादक: सागर खुडे
एकाच दिवशी दोन घडलेल्या घटनांनी शहरात भीतीचे वातावरण.
भोर, ता. १४ (प्रतिनिधी):
भोर शहरात शुक्रवारी (ता. १३) सकाळी घडलेल्या दोन वेगवेगळ्या घरफोडींच्या घटनांमुळे शहरात खळबळ उडाली आहे. संजय नगर भागातील स्वामी समर्थ नगर येथे सकाळी ९ वाजेच्या सुमारास भरदिवसा एक घरफोडी झाली. अज्ञात चोरट्यांनी घरातून तब्बल ३ लाख ६० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याबाबत घरमालक श्रीकांत लक्ष्मणराव भातलवंडे (वय ५०) हे त्यांच्या पत्नीसमवेत कामाला बाहेर गेले असताना चोरट्यांनी घराचा कडी कोयंडा तोडून आत प्रवेश केला. कपाट उघडून दागिने लंपास केले. ही घटना लक्षात येताच त्यांनी तत्काळ भोर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
दुसरी घटना त्याच दिवशी, शिक्षक सोसायटी (विठ्ठल कृपा) परिसरातही झाली. येथेही अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करून दागिने चोरीचा प्रयत्न केला; मात्र या घरातून चोरट्यांच्या हाती काही लागले नाही. दुसऱ्या घरफोडीबाबत पोलीस ठाण्यात नोंद केली नाही.
भोर पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक अण्णासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली डी.डी.खांडे तपास करीत आहे.
पुण्यभूमी विशेष
भोर सारख्या शांत शहरात अशा प्रकारच्या घटना वाढू लागल्यास, लोकांच्या मनात असुरक्षिततेची भावना निर्माण होणे स्वाभाविक आहे.यावेळी नागरिकांनी सतर्क रहावे,घरांमध्ये आणि बाहेर सुरक्षा यंत्रणा बसवाव्यात.


