सेवापूर्तीनिमित्त भिमराव शिंदे यांचा संग्राम थोपटे यांचे हस्ते सत्कार


पुण्यभूमी महाराष्ट्र न्यूज

कार्यकारी संपादक: सागर खुडे

 

बालवडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील पदवीधर शिक्षक भिमराव शिंदे यांचा सेवापूर्तीनिमित्त भोर राजगड मुळशी मतदारसंघाचे माजी आमदार संग्राम थोपटे यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.

भिमराव शिंदे यांनी शिक्षण या पवित्र क्षेत्रामध्ये ज्ञानदानाच्या माध्यमातून शाळेत अनेक नाविन्यपूर्ण आणि यशस्वी उपक्रम राबवून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करुन अनेक विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध केले आहे.त्यांच्या या कर्तृत्वामुळे त्यांना महाराष्ट्र शासनाचा राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला आहे असे गौरवोद्गार मा.आमदार संग्राम थोपटे यांनी काढले. दप्तराविना शाळा या नाविन्यपूर्ण उपक्रमातुन त्यांनी विद्यार्थ्यांच्या पाठीवरील ओझे कमी करुन दप्तराचे वजन फक्त दोनशे ग्रॅम केले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या पाठीचे विकार कमी झाले.माझी शाळा माझी परसबाग या उपक्रमांतर्गत शाळेतच सेंद्रिय फळभाज्यांचे उत्पन्न घेऊन त्याचा उपयोग शालेय पोषण आहार मध्यान्ह भोजनात केला.त्यामुळे विद्यार्थ्यांना चविष्ट आणि अधिक पोषक आहार मिळाल्याने विद्यार्थी उपस्थिती वाढली.फिरते वाचनालय सुरु करुन वाचन संस्कृती रुजवून विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण केली.आदिवासी विद्यार्थ्यांना मोफत सायकल वाटप करुन त्यांना शैक्षणिक प्रवाहात आणले आणि टिकवून ठेवले.सह्याद्री वाहिनीवरील शरद मल्हार या राज्यस्तरीय लोकनृत्य स्पर्धेत त्यांच्या विद्यार्थ्यांनी द्वितीय क्रमांक मिळवला आहे.कोरोना या महामारीच्या भीषण काळामध्ये ऑनलाईन शिक्षणाबरोबरच कोरोनाच्या नियमांचे पालन करत ओसरीवरची शाळा सुरु करुन विद्यार्थांचे ऑफलाईन शिक्षण सुरु ठेवले होते.आणि त्याच काळात लोकसहभागातून दोन लाख रुपयांचे शालेय रंगकाम केले.विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे युगामध्ये विद्यार्थी मागे राहू नयेत यासाठी त्यांनी

ADVERTISEMENT

लोकसहभागातून अडीच लाख रुपयांची अद्ययावत कंप्युटर लॅब तयार केली आहे.त्यांनी शाळापुर्व तयारी मेळावा,बाल आनंद मेळावा,पुस्तक गुढी,क्षेत्र भेटी,परिसर सहल,अधिकारी आपल्या शाळेत यासारखे अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून सर्वगुणसंपन्न असे विद्यार्थी घडवले आहेत.इंजिनियर, वकील,शिक्षक,पोलिस,आदर्श शेतकरी,यशस्वी उद्योजक,नौदल,हवाईदल अशा अनेक विविध क्षेत्रांमध्ये त्यांचे विद्यार्थी कार्यरत आहेत.विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण, निरोगी आरोग्य आणि उत्तम संस्कार मिळालेच पाहिजेत अशी त्यांची शिक्षणातील विद्यार्थ्यांविषयीची त्रिसूत्री होती.

शिक्षणाबरोबरच समाजकार्यात देखील त्यांनी भरीव कामगिरी केली आहे, आणि करत आहेत.या कामी पत्नी निलीमा शिंदे यांचाही सहभाग असतो.गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील शालेय विद्यार्थ्यांसाठी त्यांनी दोनशे वाचनीय पुस्तके भेट दिली आहेत.अनाथ आश्रमांसाठी त्यांचा नेहमीच मदतीचा हात असतो.वृक्षारोपणाच्या माध्यमातून त्यांनी गावातील रस्त्याच्या दोन्ही बाजुला तसेच रायरेश्वर आणि रोहिडेश्वर किल्ल्यावर झाडे लावून ती जगण्यासाठी त्यांना पाणी देऊन विशेष काळजी घेतली आहे.

संघटनात्मक कार्यात देखील त्यांनी आपला ठसा उमटवला आहे.उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ,पुणे जिल्हाध्यक्ष राष्ट्रीय राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक संघ ,सदस्य शिक्षण समिती पंचायत समिती भोर,सदस्य शांतता समिती पोलिस स्टेशन भोर अशी विविध संघटनात्मक कामे त्यांनी केली आहेत.

त्यांच्या या आदर्शवत शैक्षणिक आणि सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना विविध सामाजिक संस्थांचे पुरस्कार मिळाले असून पंचायत समिती शिक्षण विभाग भोर ,जिल्हा परिषद पुणे शिक्षण विभाग दोन वेळा आणि महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण विभाग यांजकडून आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला आहे.

यावेळी माजी आमदार संग्राम थोपटे रोहा प्रांत अधिकारी ज्ञानेश्वर खुटवड सकाळचे व्यवस्थापक सुभाष खुटवड भाजपा राज्य कार्यकारिणी सदस्य बाळासाहेब गरुड उद्योजक उल्हास कड पाटील शुभम कड पाटील भाजपा खरेदी विक्री संघ चेअरमन अतुल किंद्रे कृषी उत्पन्न बाजार समिती चेअरमन आनंदा आंबवले भोर दक्षिण तालुका अध्यक्ष रविंद्र कंक जेजुरी देवसंस्थान माजी अध्यक्ष प्रसाद शिंदे बाळासाहेब शिंदे अनिल सावले रमेश बुदगुडे समीर घोडेकर सुदाम ओंबळे सुरेश खोपडे बापू जेधे रमाकांत शिंदे रुपेश जाधव आदी उपस्थित होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!