भोरच्या पूर्व भागासाठी नवी पोलिस चौकी स्थापन होणार? शिवसेनेचा पुढाकार – एसपी संदीप गिल यांच्याकडे शिफारसपत्र सादर


भोर (प्रतिनिधी) – भोर तालुक्याच्या पूर्व भागातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी आणि प्रशासनाची पकड अधिक बळकट व्हावी, या उद्देशाने या भागात नवी पोलीस मदत केंद्र (चौकी) स्थापन व्हावी, अशी ठोस मागणी करण्यात आली आहे. या मागणीला पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

 

शिवसेना उपजिल्हाप्रमुख गणेश शरदराव निगडे यांनी या मुद्द्यावर पुढाकार घेत एसपी गिल साहेबांची भेट घेतली. या बैठकीत त्यांनी पूर्व भागातील पोलिस यंत्रणा बळकट करण्यासाठी सविस्तर चर्चा केली. यावेळी गृहराज्यमंत्री नामदार योगेशजी कदम यांच्याकडे सादर करण्यात आलेले शिफारसपत्र अधिकृतरित्या गिल यांना सुपूर्त करण्यात आले.

 

तालुक्याच्या पूर्व भागात कोणकोणती गावे येतात?

ADVERTISEMENT

 

राजापूर, भोंगवली, न्हावी, भांबवडे, पेंजळवाडी यांसारख्या अनेक गावांचा समावेश असलेल्या पूर्व पट्ट्यात मोठ्या प्रमाणात लोकवस्ती वाढली आहे. या भागात नागरिकांना वेळच्यावेळी पोलीस मदतीची गरज भासते. सध्या मुख्य पोलिस ठाण्यापासून लांब असल्यामुळे अनेक वेळा वेळेवर मदत पोहोचण्यात अडचणी येतात.

 

गणेश निगडे म्हणाले,

“पूर्व भागातील नागरिकांना अधिक सुरक्षितता, वेळीच पोलिस मदत, आणि कायदा सुव्यवस्थेची प्रभावी अंमलबजावणी मिळावी, यासाठी नविन पोलीस मदत केंद्राची नितांत आवश्यकता आहे. ही मागणी फक्त राजकीय नाही, तर सामाजिक बांधिलकीतून आलेली आहे.”

 

एसपी संदीपसिंह गिल यांनीही या मागणीवर सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच या मागणीची स्थळ पाहणी आणि प्राथमिक प्रक्रिया सुरू करण्याचे आश्वासन दिले. तसेच पोलिस गस्त वाढवण्याच्या मुद्द्यावरही त्यांनी सकारात्मक विचार केला.

 

या भेटीनंतर स्थानिक नागरिकांत समाधानाचे वातावरण आहे. नविन पोलिस मदत केंद्र स्थापनेसाठीचा हा महत्त्वपूर्ण टप्पा मानला जात आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!