उपोषणकर्त्यावर पोलिस अधिकाऱ्याचा लाथाबुक्क्यांचा मार – प्रहार जनशक्ती पक्ष अजय कांबळे यांची आक्रमक भूमिका


प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष अजय कांबळे यांची मागणी – दोषी अधिकाऱ्यावर कठोर कारवाई करावी.

भोर:- – स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर जालना येथे उपोषण सुरू असताना पोलिसांच्या अमानवी वर्तनाने संताप व्यक्त होत आहे. दिनांक १५ ऑगस्ट रोजी घडलेल्या घटनेत मा. DySP अनंत कुलकर्णी यांनी शांततेत उपोषण करणाऱ्या एका आंदोलनकर्त्याच्या पाठीवर थेट लाथ घालून अमानवी कृत्य केल्याचे समोर आले आहे. या घटनेचे दृश्य माध्यमांमधून व सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने पोलिसांच्या वर्तनाबाबत तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

या संदर्भात प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष अजय कांबळे यांनी महाराष्ट्र मानवाधिकार आयोग, मुंबई येथे निवेदन सादर करून कठोर कारवाईची मागणी केली आहे. त्यांनी आपल्या निवेदनात नमूद केले की,

“मानवाधिकार कायद्यानुसार प्रत्येक नागरिकास मानवी प्रतिष्ठेसह जगण्याचा अधिकार, शांततेने आंदोलन करण्याचा अधिकार आणि अमानुष व अपमानास्पद वर्तनापासून संरक्षणाचा अधिकार मिळालेला आहे. परंतु या घटनेत हे हक्क उघडपणे पायदळी तुडवले गेले आहेत.”

ADVERTISEMENT

कांबळे यांनी आयोगास पुढील मागण्या केल्या आहेत –

1. मा. DySP अनंत कुलकर्णी यांच्यावर मानवाधिकार उल्लंघनाचा गुन्हा दाखल करावा.

2. संबंधित अधिकाऱ्याची सेवेतून बडतर्फी करण्यात यावी.

3. पीडित उपोषणकर्त्याला न्याय व नुकसानभरपाई मिळावी.

4. भविष्यात अशा अमानुष घटनांना आळा बसावा म्हणून आयोगाने राज्य सरकारला स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे द्यावीत.

कांबळे यांनी स्पष्ट इशारा दिला की, जर दोषींवर तात्काळ कारवाई झाली नाही तर प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने राज्यव्यापी आंदोलन उभारले जाईल.

दरम्यान, पोलिसांच्या वर्तनामुळे संतप्त नागरिकांमध्ये आणि सामाजिक संस्थांमध्ये रोष पसरला आहे. “वर्दीवरील जबाबदार अधिकाऱ्यांकडून अशा प्रकारच्या हिंसाचाराची अपेक्षा नसते,” अशा शब्दांत नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

 

या घटनेनंतर मानवाधिकार आयोग कोणती भूमिका घेते, तसेच राज्य सरकार दोषींवर काय कारवाई करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!