भोंगवली ग्रामपंचायतीतील विकास कामांवर पुन्हा सखोल चौकशी जिल्हा परिषदेकडून आदेश
दि.12 भोर:- – मौजे भोंगवली ग्रामपंचायत येथील सरपंच अरुण विठ्ठल पवार यांनी सरपंच पदाचा कार्यभार स्वीकारल्यापासून ते पदाचा कार्यकाळ संपेपर्यंत झालेल्या विकास कामांचा, शासनाकडून आलेल्या निधीचा तसेच संबंधित खात्यांचा सखोल तपास पुन्हा करण्यात यावा, असे आदेश जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाकडून देण्यात आले आहेत.
शिव प्रहार प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष संतोष ज्ञानोबा मोहिते (मु.पो. किकवी, ता. भोर) यांनी केलेल्या लेखी तक्रारीच्या आधारे ही कारवाई सुरू झाली.त्यांच्या अर्जात सरपंच पवार आणि त्यावेळचे ग्रामसेवक जकप्पा बिराजदार यांनी पदभार काळात केलेल्या सर्व विकास कामांची अंदाजपत्रके, मासिक सभा ठराव, मुल्यांकन व देयकांची तपशीलवार चौकशी करण्याची मागणी करण्यात आली होती.
या प्रकरणी जिल्हा परिषदेच्या आदेशानुसार गटविकास अधिकारी (वेल्हा) यांना चौकशीची जबाबदारी सोपवण्यात आली होती. मात्र, १९ मे २०२५ रोजी सादर केलेल्या प्राथमिक अहवालात आवश्यक कागदपत्रे – जसे की अंदाजपत्रके, मासिक सभा ठराव, मुल्यांकन व देयकांची नोंद – तपासणीसाठी उपलब्ध न झाल्याचे नमूद करण्यात आले होते. त्यामुळे चौकशी अपूर्ण राहिली होती.
या पार्श्वभूमीवर उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत), पुणे जिल्हा परिषद यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तक्रारीतील सर्व मुद्द्यांच्या अनुषंगाने पुन्हा सखोल चौकशी करून संपूर्ण अहवाल तात्काळ सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
१९ जानेवारी २०२५ – शिव प्रहार प्रतिष्ठानकडून जिल्हा परिषदेकडे तक्रार दाखल
४ फेब्रुवारी २०२५ – चौकशी आदेश जारी
१९ मे २०२५ – प्राथमिक अहवाल सादर; कागदपत्रे उपलब्ध नसल्याने निष्कर्ष निघू शकला नाही
१२ सप्टेंबर २०२५ – जिल्हा परिषदेकडून पुन्हा सखोल चौकशीचे आदेश
या चौकशीचा निकाल लागल्यानंतर भोंगवली ग्रामपंचायतीतील विकासकामांचा निधी वापर आणि प्रशासनातील पारदर्शकता याबाबतची खरी स्थिती समोर येण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.