रस्त्याच्या दुरुस्तीकरिता भोंगवली फाटा येथे १९ सप्टेंबर रोजी अमरण उपोषण व रस्ता रोको
दि. 16 सारोळे :- भोर तालुक्यातील पुर्व विभाग रस्ता विकास कृती समितीने सारोळा–वीर रस्त्यावरील भोंगवली फाट्यावर रस्त्याची दयनीय अवस्था लक्षात घेऊन १९ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता अमरण उपोषण सुरू करण्याचा निर्णय मल्हार हॉटेल सारोळा येथे घेतला आहे.
दुपारी ३ वाजेपर्यंत संबंधित अधिकाऱ्यांनी ठोस उपाययोजना जाहीर केल्या नाहीत, तर रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा समितीने दिला आहे.
सदर रस्त्यावर गेल्या अनेक महिन्यांपासून मोठमोठे खड्डे असून वाहनांचे अपघात, विद्यार्थ्यांना शाळेत जाण्या-येण्यात अडचणी, शेतकऱ्यांना शेतीमाल वाहतुकीत त्रास अशा गंभीर समस्या निर्माण झाल्या आहेत. नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाल्याने तातडीने रस्ता काँक्रिटीकरणाचे काम सुरू होणे आवश्यक असल्याचे समितीचे म्हणणे आहे.
यापूर्वी देखील याच रस्त्याबाबत अनेक आंदोलनं झाली होती. खड्ड्यांवर आंदोलन, झाडावर आंदोलन, रस्ता रोको, तसेच अमरण उपोषणही करण्यात आले होते. त्यावेळी संबंधित विभागाने तात्पुरती आश्वासने दिली, काही किरकोळ डागडुजी केली, मात्र काही दिवसांत पुन्हा खड्डे निर्माण झाले आणि स्थिती जैसे थे झाली, असा नागरिकांचा आरोप आहे.
शुभम शेटे आणि अजय कांबळे हे दोघे अमरण उपोषणास बसणार आहेत. आंदोलनाची तोड सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भंडारेमॅडम यांच्या उपस्थितीतच केली जाईल, अशी समितीची ठाम भूमिका आहे.
समितीने स्पष्ट इशारा दिला आहे की, रस्त्याचे काँक्रिटीकरण तातडीने सुरू न झाल्यास, पूर्व विभागातील सर्व गावे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत बहिष्कार टाकतील आणि शासनाविरुद्ध तीव्र आंदोलन छेडतील.
दरम्यान, कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी योग्य पोलीस बंदोबस्त ठेवण्याची विनंती समितीने राजगड पोलीस ठाण्याकडे केली आहे.


