पांडे गावात पंचायतराज अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद; ग्रामस्थांचा एकमुखी पाठिंबा
दि. 17 सारोळे :- भोर तालुक्यातील पांडे गावात पंचायतराज अभियान राबविण्यासाठी आयोजित विशेष ग्रामसभा उत्साहात पार पडली. गावातील ग्रामस्थ, तरुण मंडळ, महिला, विविध समित्या तसेच सामाजिक आणि शैक्षणिक संघटनांचा यात मोठ्या प्रमाणावर सहभाग दिसून आला. ग्रामसभा सुरू होताच ग्रामपंचायतीच्या वतीने अभियानाचे उद्दिष्ट, गरज आणि त्याचा गावाच्या विकासावर होणारा सकारात्मक परिणाम याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.
या ग्रामसभेला सरपंच तेजस साळुंके, उपसरपंच रेश्मा साळुंके, तसेच ग्रामविकास अधिकारी योगेश चव्हाण यांची उपस्थिती लाभली. त्यांनी ग्रामस्थांना अभियानाबाबत मार्गदर्शन करताना पंचायतराज व्यवस्थेच्या माध्यमातून गावाचा सर्वांगीण विकास घडवण्यासाठी प्रत्येक नागरिकाने सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन केले.
या प्रसंगी आयुष्मान भारत कार्डांचे वाटप करण्यात आले, ज्यामुळे गावातील नागरिकांना आरोग्य विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रोत्साहन मिळाले. नागरिकांच्या प्रश्नांना उत्तर देत या योजनेची प्रक्रिया, कार्डचा वापर आणि लाभ कसा घ्यायचा याबद्दल अधिकारी आणि स्वयंसेवकांनी सविस्तर मार्गदर्शन केले.
अभियानाच्या प्रारंभी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पांडे येथील विद्यार्थी व शिक्षकांनी प्रभात फेरी काढून गावभर जनजागृती केली. या फेरीदरम्यान विद्यार्थ्यांनी घोषवाक्ये देत स्वच्छ, सशक्त व प्रगत गाव घडविण्याचे आवाहन केले. शाळेतील विद्यार्थ्यांच्या या उत्साहामुळे ग्रामस्थांमध्येही नवा जोश संचारला.
ग्रामसभेत ग्रामस्थांनी एकमुखी ठराव करून पंचायतराज अभियानाला पूर्ण पाठिंबा जाहीर केला. यावेळी सरपंच तेजस साळुंके, उपसरपंच रेश्मा साळुंके आणि ग्रामविकास अधिकारी योगेश चव्हाण यांनी ग्रामस्थांचे आभार मानले व हे अभियान केवळ शासकीय नसून, गावाच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांच्या संयुक्त प्रयत्नांची गरज असल्याचे स्पष्ट केले.
गावातील महिलांनी आणि युवकांनी स्वच्छता मोहीम राबवत सार्वजनिक ठिकाणी व रस्त्यांवर स्वच्छतेचा संदेश दिला. काही ठिकाणी रोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संकल्प करण्यात आला. गावातील विविध क्षेत्रात कार्यरत मंडळे आणि संघटनांनी अभियानासाठी आपला सक्रिय सहभाग नोंदवला व पुढील काळातही सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.या उपक्रमामुळे गावकऱ्यांमध्ये स्वच्छता, आरोग्य, पर्यावरण संवर्धन, सुशासन आणि विकासाबाबत सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून पांडे गाव हे भोर तालुक्यातील आदर्श गावांच्या दिशेने पाऊल टाकत आहे.
तेजस साळुंखे सरपंच पांडे.