रस्ता विकास कृती समितीच्या आमरण उपोषणाला शासनाचा सकारात्मक प्रतिसाद!भोंगवली–माहूर खिंड रस्त्याचे काम 29 सप्टेंबरपासून; सारोळा–वीर रस्त्याचा प्रस्ताव शासनाकडे जाणार
संपादक :मंगेश पवार
कार्यकारी संपादक: सागर खुडे
सारोळे : पूर्व भागातील सारोळे ते वीर आणि भोंगवली फाटा ते माहूर फाटा रस्त्यांची दुरवस्था, शेतकरी–कामगार वर्गाच्या अडचणी आणि विद्यार्थ्यांच्या हालअपेष्टा याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी पूर्व विभाग रस्ता विकास कृती समितीने दि. 19 सप्टेंबर 2025 रोजी भोंगवली फाटा येथे आमरण उपोषण सुरु केले.
या आंदोलनादरम्यान नागरिक, शेतकरी, विद्यार्थी, पूर्व भागातील 11 गावातील सरपंच,उपसरपंच, सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाले. परिस्थितीची जाणीव करून देताना समितीने अधिकाऱ्यांकडे संतप्त शब्दांत लक्ष वेधले. समितीचे पदाधिकारी उपाध्यक्ष शुभम शेटे म्हणाले,
“गेंड्याची कातडी असलेल्या काही अधिकाऱ्यांना आज प्रत्यक्ष रस्त्यावरून जाताना समजले असेल की ग्रामीण भागातील कामगार, शेतकरी आणि विद्यार्थी रोज कोणत्या अडचणींना सामोरे जातात. हाच संदेश पोहोचवण्यासाठी आम्ही सारोळे येथे नव्हे, तर भोंगवली फाटा येथे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला.”
या तीव्र शब्दांनंतरही चर्चेचा सूर सकारात्मक राहिला आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने उपाययोजना जाहीर केल्या. बैठकीत पुढील निर्णय घेण्यात आले –
1)भोंगवली – माहूर खिंड रस्ता
काम 29 सप्टेंबरपासून सुरू होणार असून गुणवत्तेसाठी स्वतंत्र क्वालिटी टीम नेमण्यात येईल.
2) सारोळा – वीर रस्ता :
या रस्त्याचा नव्या सिमेंट काँक्रीट रस्त्याचा प्रस्ताव तयार करून शासनाकडे तातडीने पाठविला जाणार आहे. प्रस्तावाची प्रत समितीला दिली जाईल.
3) विशेष बैठक :
पुढील कामकाजावर चर्चा करण्यासाठी 24 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता विशेष बैठक होईल. यामध्ये मा. आमदार शंकर मांडेकर, मुख्य कार्यकारी अभियंता भडारे मॅडम, तसेच समिती सदस्य उपस्थित राहतील.
शासनाच्या या सकारात्मक भूमिकेबद्दल समितीने अधिकाऱ्यांचे आभार मानले. मात्र, कामे वेळेत पूर्ण न झाल्यास आंदोलन मोठ्या प्रमाणावर पुन्हा छेडण्याचा इशारा देण्यात आला.
उपोषणस्थळी चंद्रकांत बाठे, गणेश निगडे, रोहन बाठे, अक्षय सोनवणे, वैभव धाडवे, संतोष मोहिते, महेश टापरे, विक्रम खुटवड, शैलेश सोनवणे, जीवन अप्पा कोंडे, साईनाथ धाडवे,बाळासाहेब खुटवड, भरत सोनावणे, सत्यजित जगताप, दिलीप बोबडे, अरुण पवार,तेजस साळुंके, गणेश साळुंके, महादेव शेडगे, किरण सोनावणे,हेमंत चव्हाण, सुरेश सोनावणे, विशाल निगडे, संतोष सपकाळ, मुरली भालेराव, निलेश भांडे, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहून मार्गदर्शन केले.
शासनाच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागाचे आगळे साहेब व हलाळ साहेब यांनी उपोषणस्थळी येऊन समितीला लेखी आश्वासन दिले.
स्थानिक नागरिकांमध्ये या निर्णयामुळे दिलासा आणि समाधानाचे वातावरण असून, अनेक वर्षांपासून रखडलेल्या रस्त्यांच्या कामांना आता गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
“रस्ता विकासाच्या लढ्यात सर्व पक्षांनी एकत्र येऊन पाठिंबा दिला आहे. ग्रामीण भागातील रस्ते हे शेतकरी, विद्यार्थी आणि सामान्य नागरिकांच्या दैनंदिन जीवनाचा कणा आहेत. आत्तापर्यंत अनेक आंदोलने झाली, परंतु केवळ तात्पुरती आश्वासने देऊन मलमपट्टी केली गेली
अजय कांबळे, कृती समिती सदस्य
कॉंक्रिटीकरण किंवा दीर्घकालीन उपाय झाले नाहीत. त्यामुळे या वेळी शासनाने दिलेल्या आश्वासनाची अंमलबजावणी वेळेत होऊन रस्त्यांचे काम दर्जेदार पूर्ण व्हावे, हीच अपेक्षा आहे. लढ्यात एकजुटीने सहभागी झालेल्या सर्व पूर्व विभाग रस्ता विकास कृती समितीचे सदस्य, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, तसेच स्थानिक पत्रकार बंधूंचे मनःपूर्वक आभार.”
संतोष बोबडे अध्यक्ष कृती समिती