लोणंद नगरपंचायतीत कोट्यवधींचा अपहार? गणेश दणाने व सागर खरात यांचा गंभीर आरोप – उपोषण व जलसमाधीचा इशारा
निवासी संपादक दिलीप वाघमारे
लोणंद नगरपंचायत स्थापनेपासून आतापर्यंत साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे दलित वस्ती सुधार योजना या योजनेत कोट्यवधी रुपयांचा निधी हडप झाल्याचा गंभीर आरोप गणेश दणाने व सागर खरात यांनी केला आहे.जिल्हाधिकारी संतोष पाटील यांना याबाबत निवेदन देण्यात आले आहे
त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जिल्हाधिकारी सातारा तसेच सहाय्यक आयुक्त समाजकल्याण सातारा यांच्याकडे पुराव्यासह तक्रार अर्ज दाखल करूनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. उलट, सह आयुक्त नगरपालिका प्रशासन शाखा जिल्हाधिकारी कार्यालय सातारा यांनी जाणीवपूर्वक प्रकरणाकडे दुर्लक्ष करून भ्रष्टाचाराला पाठीशी घातल्याचा संशय आहे.
दणाने व खरात यांनी प्रशासनावर थेट आरोप करत इशारा दिला आहे की, दि. २९ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी १० वा. जिल्हाधिकारी कार्यालय सातारा समोर दोन दिवसीय आमरण उपोषण करण्यात येईल. तसेच या उपोषणाची दखल न घेतल्यास दि. १ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ११ वा. पाडेगाव येथील नीरा उजवा कालव्यात जलसमाधी आंदोलन करण्यात येईल.
त्यांच्या मुख्य मागण्या :
दलित वस्ती सुधार योजना अपहार प्रकरणी १५ दिवसांत चौकशी समिती गठीत करणे.
दोषींवर ॲट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हे दाखल करणे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून मालमत्तेची चौकशी.
नगरपंचायतीतील सर्व ठरावांची चौकशी.
१० वर्षांपासून एकाच पदावर असलेल्या अधिकाऱ्यांची बदली.
गणेश दणाने व सागर खरात यांनी स्पष्ट केले आहे की, “दलित समाजावर झालेला अन्याय सहन केला जाणार नाही, भ्रष्टाचार करणाऱ्यांना वाचविणाऱ्या अधिकाऱ्यांनाही जबाबदार धरले जाईल.”
तसेच सुंदरनगर प्रभाग क्र १७ मध्ये सिमेंट पेव्हर ब्लॉक टाकले संदर्भात ठराव मंजूर करून करण्यात आलेले कामाची चौकशी करण्यात यावी


