वाघोशी येथे ‘जल अर्पण दिवस’ उत्साहात साजरा


संपादक दिलीप वाघमारे

खंडाळा तालुक्यातील वाघोशी (जि. सातारा) येथे ‘जल अर्पण दिवस’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला पंचायत समिती खंडाळाचे गटविकास अधिकारी अनिल वाघमारे प्रमुख उपस्थित होते.

यावेळी बोलताना अनिल वाघमारे यांनी जलजीवन मिशन योजनेमुळे वाघोशी गावात प्रत्येक घर, शाळा आणि अंगणवाडीपर्यंत दर्जेदार व स्वच्छ पाणी पोहोचत असल्याचे सांगितले. तसेच पाणी बचत, पाण्याचे महत्त्व, पाणी गुणवत्ता व पाणी तपासणी याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. ग्रामपंचायतीने केलेल्या वृक्षारोपण उपक्रमाचे तसेच मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत केलेल्या कामांचे आणि लोकसहभागाचे त्यांनी कौतुक केले.

मागील काही वर्षांपूर्वी गावाला टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत होता. मात्र जलजीवन मिशन आणि पाणी स्त्रोत बळकटीकरणामुळे आता टँकरची गरज संपली असून गावात दररोज प्रत्येक कुटुंब, शासकीय व सार्वजनिक संस्थांना नियमित व गुणवत्तापूर्ण पाणीपुरवठा होत आहे. येत्या काळात प्रत्येक नळजोडणीस मीटर बसवण्याचे आवाहनही त्यांनी केले.

ADVERTISEMENT

ग्रामीण पाणीपुरवठा उपविभाग खंडाळाचे उपअभियंता संजय लाडे यांनी वाघोशीतील जलजीवन कामांची सविस्तर माहिती देत भविष्यातील पाणी बचतीचे महत्त्व अधोरेखित केले.

या कार्यक्रमात पाणी कलश पूजन, जनजागृती रॅली, पाणी गुणवत्ता तपासणी, पाणी बचत शपथ, जल अर्पण सोहळा, दिव्यांग कार्ड वाटप, आयुष्यमान भारत कार्ड वितरण, दिव्यांग सहाय्य धनादेश, गुणवंत विद्यार्थी सन्मान तसेच बचत गटांना धनादेश वाटप असे विविध उपक्रम घेण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रामपंचायत अधिकारी दत्तात्रय राऊत यांनी केले, तर सूत्रसंचालन जिल्हा परिषद शाळा वाघोशीचे मुख्याध्यापक श्रीरंग जाधव यांनी केले.

या कार्यक्रमाला प्रशासक सुनंदा धायगुडे, प्रशासकीय समिती सदस्य, कनिष्ठ अभियंता माधुरी मगर, सुरज तडसे, स्वच्छ भारत मिशन तालुका समन्वयक सीमा गायकवाड, तसेच ग्रामपंचायत पदाधिकारी, शिक्षक, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, बचत गट सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!