भोर तालुक्यात भात पीक स्पर्धेचा निकाल जाहीर; किकवीच्या चंद्रकांत निगडे यांची मेहनत ठरली उजवी
मंगेश पवार
सारोळे : राज्यातील शेतकऱ्यांना प्रोत्साहन देऊन कृषी उत्पादन वाढविण्याच्या उद्देशाने राबविण्यात आलेल्या खरीप हंगाम 2025 मधील भात पीक स्पर्धेचा तालुकास्तरीय निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. या स्पर्धेत सर्वसाधारण गटातून प्रथम तीन क्रमांक पटकावणाऱ्या शेतकऱ्यांना बक्षीस देऊन गौरविण्यात आले.
यामध्ये प्रथम क्रमांक नरसिंह रामभाऊ बांदल (इंगवली-आळंदे), द्वितीय क्रमांक किकवी येथील मेहनती व प्रयोगशील शेतकरी चंद्रकांत दत्तात्रय निगडे यांनी पटकावला, तर तृतीय क्रमांक संतोष नारायण शिंदे (कुसगाव) यांनी मिळवला.
किकवी गावातील चंद्रकांत निगडे यांनी अत्यंत मेहनत, योग्य नियोजन आणि आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा वापर करत भात पिकामध्ये उत्कृष्ट उत्पादन घेतले. कमी खर्चात जास्त उत्पादन मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. शेतीकडे त्यांनी केवळ व्यवसाय म्हणून न पाहता वैज्ञानिक दृष्टिकोनातून केलेले नियोजन आणि वेळेवर घेतलेली काळजी यामुळेच त्यांना हा मानाचा दुसरा क्रमांक मिळाला आहे.
भोर येथील सह्याद्री मंगल कार्यालयात आयोजित मुख्यमंत्री पानंद रस्ते योजना, खरीप हंगाम व पाणीटंचाई आढावा बैठकीदरम्यान या विजेत्या शेतकऱ्यांचा मा. आमदार शंकर भाऊ मांडेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी प्रांताधिकारी विकास खरात, तहसीलदार राजेंद्र नजन, तालुका कृषी अधिकारी शरद धर्माधिकारी, गट विकास अधिकारी चंद्रकांत विपट, सभापती मनीषा कंक, उपसभापती विशाल कोंडे, जिल्हा परिषद सदस्य विक्रम खुटवड, प्रवीण जगदाळे, माजी जिल्हा परिषद सदस्य रंजीत शिवतरे, तृप्ती खुटवड, राजेश बोडके, नगराध्यक्ष रामचंद्र आवारे तसेच कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
शेतकऱ्यांच्या मनोबलात वाढ होऊन नवतंत्रज्ञानाचा शेतीत अधिक वापर व्हावा, उत्पादन क्षमता वाढावी आणि राज्याच्या अन्नसुरक्षेला बळकटी मिळावी या उद्देशाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. विजेत्या शेतकऱ्यांच्या यशामुळे तालुक्यातील इतर प्रयोगशील शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळेल, तसेच त्यांचे मार्गदर्शन परिसरातील शेतकऱ्यांसाठी दिशादर्शक ठरेल, असे मत तालुका कृषी अधिकारी शरद धर्माधिकारी यांनी व्यक्त केले.


