न्हावी येथे पीक कर्ज वाटपाचा शुभारंभ; ९४.४५% वसुलीमुळे सहकाराची ताकद अधोरेखित


मंगेश पवार

सारोळे (प्रतिनिधी) – “विना सहकार नाही उद्धार” या तत्वाला साजेसा उपक्रम राबवत पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या न्हावी शाखेत न्हावी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीमार्फत पीक कर्ज वाटपाचा शुभारंभ बँकेचे संचालक माननीय भालचंद्र जगताप यांच्या हस्ते उत्साहात पार पडला.

भोर विभागातील सर्वात मोठ्या या संस्थेचे सुमारे १३०० सभासद असून, सन २०२५-२६ हंगामात ७७५ सभासदांना ८ कोटी ६६ लाख रुपयांचे पीक कर्ज वितरित करण्यात आले होते. त्यापैकी ३१ मार्च २०२६ अखेर ७४० सभासदांनी ८ कोटी १८ लाख रुपयांची परतफेड करत ९४.४५ टक्के वसुली साध्य केली आहे. या उत्कृष्ट कामगिरीमुळे सहकार क्षेत्राची विश्वासार्हता अधोरेखित झाली आहे.

ADVERTISEMENT

याच पार्श्वभूमीवर कर्जाची वेळेत परतफेड करणाऱ्या सभासदांना तात्काळ नवीन कर्ज उपलब्ध करून देण्याच्या धोरणानुसार, न्हावी विकास संस्थेमार्फत १२५ सभासदांना १ कोटी ५७ लाख ९३ हजार ८०० रुपयांचे पीक कर्ज प्राथमिक तत्त्वावर मंजूर करण्यात आले. नारळ वाढवून व कमाल मर्यादा पूजन करून संबंधित रक्कम खातेदारांच्या खात्यावर वर्ग करण्यासाठी बँकेकडे सुपूर्द करण्यात आली.

यावेळी संस्थेचे चेअरमन अवधूत सोनवणे, व्हाईस चेअरमन लक्ष्मण बोंद्रे, माजी चेअरमन नवनाथ सोनवणे, दत्तात्रय सोनवणे, माजी संचालक रवी सोनवणे, संचालक सत्यजित जगताप, शैलेश जगताप, रमेश सोनवणे, तानाजी सोनवणे तसेच इतर मान्यवर, पदाधिकारी व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रसंगी मार्गदर्शन करताना भालचंद्र जगताप यांनी शेतकरी सभासदांना जास्तीत जास्त कर्जवाटप करून बँकेमार्फत सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!