लोकशाहीर संभाजी भगत यांचा पुण्यात नागरी सत्कार; सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी
पुणे प्रतिनिधी | एस. एन. नांदेडकर
सातारा येथे होणाऱ्या १५ व्या विद्रोही साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल लोकशाहीर संभाजी भगत यांचा पुण्यात जाहीर नागरी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. “कलास्नेह व नव सांस्कृतिक पर्याय” यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम होणार असून, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे.
हा कार्यक्रम मंगळवार, दि. ७ एप्रिल २०२६ रोजी सायं. ५.०० वाजता, एस. एम. जोशी सोशलिस्ट फाऊंडेशन, नवी पेठ, पुणे येथे पार पडणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कवयित्री सरूबाई वाघमारे असणार आहेत. यावेळी ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत अंकल सोनवणे, वसंतदादा साबळे, डॉ. राजाभाऊ भैलुमे तसेच अभ्यासक बाळासाहेब कदम हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
तद्नंतर “तरी आम्ही बोलू नये” या वैचारिक कवितांच्या सादरीकरणाचा विशेष कार्यक्रमही रंगणार आहे. या कार्यक्रमात रमणी बबिता आकाश, सुमित गुणवंत, हृदयमानव अशोक, रवी कांबळे आणि पार्थ भेंडेकर हे कवी सहभागी होणार आहेत.
तसेच प्रखर विद्रोही रॅप सादरीकरण एम.सी. सोशॅलिस्ट यांच्या माध्यमातून सादर करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमासाठी महात्मा फुले द्विशताब्दी महोत्सव समिती व मूलभूत अधिकार संवर्धन कृती समिती यांचे सहकार्य लाभले असून, नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. कलास्नेह प्रमुख तसेच निमंत्रक हृदयमानव अशोक, एम.सी. सोशॅलिस्ट, नव सांस्कृतिक पर्याय व टीम यांनीही उपस्थितीचे आवाहन केले आहे.


