नराधमाची विकृती उघड; प्राणी व महिलांवर अत्याचार प्रकरणाने भोर तालुका हादरला
नसरापूर, दि. 4 (प्रतिनिधी) – पुतणी व एका ज्येष्ठ महिलेवर अत्याचार करणाऱ्या नराधमाच्या विकृत कृत्यांबाबत आणखी धक्कादायक माहिती समोर आली असून, संबंधित आरोपीने कोंबड्या, शेळ्या व कुत्र्यांवरही अत्याचार केल्याचे उघड झाले आहे. या प्रकारामुळे संपूर्ण भोर तालुका संतप्त झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी हा नसरापूरजवळील साळवडे गावचा रहिवासी असून त्याने यापूर्वीही अमानुष कृत्ये केली होती. पाच वर्षांच्या बालिकेसह एका वृद्ध महिलेसोबत अत्याचार केल्याच्या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे. या प्रकरणी राजगड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, आरोपीच्या विकृत वर्तनामुळे सुमारे २० वर्षांपूर्वी ग्रामपंचायतीने ठराव करून त्याला गावातून हाकलून दिले होते. त्यानंतर त्याने साळवडे येथील जमीन विकून नसरापूर येथे भाड्याच्या घरात कुटुंबासह वास्तव्यास होता. पुणे–सातारा महामार्गावरील कामथडी परिसरातील एका हॉटेलमध्ये तो काम करत असल्याची माहिती मिळाली आहे.
या घटनेच्या निषेधार्थ रविवारी नसरापूर, कापूरहोळ, किकवी व सारोळे या ठिकाणी कडकडीत बंद पाळण्यात आला. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने दिवसभर बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे संपूर्ण परिसरात शुकशुकाट पाहायला मिळाला असून नागरिकांमध्ये तीव्र संतापाची भावना व्यक्त होत आहे.
साळवडे गावातील स्थानिक नागरिकांनी सांगितले की, संबंधित आरोपीचा स्वभाव अत्यंत विकृत व राक्षसी असून, यापूर्वीही त्याने साळवडे गावात प्राण्यांवर अमानुष अत्याचार केले होते.


