ज्येष्ठ नेते प्रल्हादभाऊ चव्हाण यांचे निधन.
जावळी सातारा प्रतिनिधी : बजरंग चौधरी.
राष्ट्रीय काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, प्रल्हादराव जगदेवराव चव्हाण उर्फ प्रल्हादभाऊ यांचे शुक्रवारी रात्री साडेनऊच्या सुमारास निधन झाले. शनिवारी सकाळी नऊला वेळे- कामथी तर्फ सातारा या त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार झाले आहे..पदवीधर झाल्यानंतर प्रल्हादभाऊंनी सुरुवातीच्या काळात स्वामी विवेकानंद आणि रयत शिक्षण संस्थेत अध्यापनाचे काम केले. यशवंतराव चव्हाण – किसन वीर यांच्या विचार आणि नेतृत्वाने प्रभावित होऊन सार्वजनिक जीवनात त्यांनी ऐन तारुण्यात प्रवेश केला.
सातारा तालुका पंचायत समिती, सातारा जिल्हा परिषदेत त्यांनी पदाधिकारी म्हणून काम पाहत असताना सहकारातही लक्षवेधी काम केले. सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक, सातारा तालुका खरेदी विक्री संघ, सातारा जिल्हा खरेदी विक्री संघ, जिल्हा दूध संघ आदी संस्थांवरही त्यांनी पदाधिकारी म्हणून काम पाहिले आहे.
सातारा तालुका काँग्रेसचे अध्यक्ष, किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याचे संचालक संदीप चव्हाण हे त्यांचे पुत्र असून त्यांच्या विधायक आणि राजकीय कार्याचा वारसा ते पुढे चालवत आहेत.


