ग्रामस्थांनीच बुजवले श्रमदानातून राजापूर रस्त्यावरील खड्डे
पुण्यभूमी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
सारोळे : भोर तालुक्यातील पूर्व भागातील सारोळे या गावातून तीर्थक्षेत्र वीर आणि सोमेश्वर ला जोडणाऱ्या रस्त्यावर तसेच पंधरा ते वीस गावाचा दळणवळणाचा रस्ता आहे. या रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे.
मार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिकांना नाहक त्रास सोसावा लागत आहे.या रस्त्यावर अपघाताचे सत्र चालू असते. या पडलेल्या खड्ड्यांमुळे दुचाकी आणि चार चाकी चे टायर फुटत असून छोटे छोटे अपघात वारंवार घडत आहेत.
यावेळी राजापूर गावातील नागरिकांनी पुढे येऊन रस्त्यावरील खड्डे श्रमदानातून बुजवले. या श्रमदानासाठी राजापूर गावचे सामाजिक कार्यकर्ते भरत बोबडे, ज्ञानेश्वर ( माऊली )बोबडे,अमोल बोबडे, महेश बोबडे यांनी खड्डे बुजवले. यासाठी त्यांनी स्वखर्चातून खडी आणून रस्त्यावरील खड्डे बुजवले.

या रस्त्यासाठी राजापूर गावातील हर्षद बोबडे यांनी काही दिवसापूर्वी सोशल मीडियावर आवाज उठवला होता. हा रस्ता होऊन एकच वर्ष उलटले आहे. एक वर्षातच या रस्त्यावर खड्ड्यांनी रस्त्याची चाळण करून टाकली आहे. सारोळे गावच्या हद्दीतही अमोल टिंबर समोर पण असेच खड्डे आहेत. बांधकाम विभागात खड्डे बुजवण्यासंदर्भात पत्र हर्षद बोबडे,महेश सुरेश बोबडे, शांताराम खुटवड यांनी दिले आहे उर्वरित रस्त्यावरील खड्डे बांधकाम विभागाने न भरल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल असा इशारा ग्रामस्थांनी पुण्यभूमी महाराष्ट्र न्यूज शी बोलताना सांगितले आहे.


