सारोळे वीर रस्त्याची दुरुस्ती करा अन्यथा तीव्र आंदोलन.
दि.५ सारोळे ते वीर रस्त्याची दुरवस्था झाली असून त्याची तातडीने दुरुस्ती करावी, या मागणीसाठी स्थानिक ग्रामस्थ सोमवारी (दि.१२) सकाळी दहा वाजता भोंगवली फाटा येथे रास्ता रोको आंदोलन करणार आहेत. पुणे जिल्हा मधवर्ती बँक चे संचालक श्री. भालचंद्र जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली भोर तालुका प्रहार जनशक्ती पक्षाचे उपाध्यक्ष अजय कांबळे,भोंगवली गावचे सरपंच अरुण पवार व राजापूर गावचे सरपंच बाळासाहेब बोबडे आणि सहकाऱ्यांनी तहसीलदारांना आंदोलनाबाबत निवेदन दिले आहे.
सारोळा ते वीर या मार्गावर रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे, या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडल्यामुळे या रस्त्यावरून जाणाऱ्या येणाऱ्या वाहन चालकांना नाहक त्रास सोसावा लागत आहे.
मार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे अपघाताचे सत्र चालू असते. या पडलेल्या खड्ड्यामुळे दुचाकी आणि चार चाकीचे टायर फुटत असून, छोटे छोटे अपघात वारंवार घडत आहे. या खड्ड्यांमुळे लोकांच्या पाठीला मानेला कमरेला त्रास होत आहे. या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी यापूर्वीही दि. २३ रोजी बांधकाम विभागास निवेदन दिले होते.
रस्त्याच्या दुरुस्तीसाठी सारोळे,पांडे,राजापूर, भोंगवली, भांबवडे, सावरदरे न्हावी ग्रामस्थ रास्ता रोको आंदोलन करणार आहे.