विद्येचे माहेरघर पुण्यामध्ये भोर तालुक्यातील भोंगवली गावातील युवकाला झिरो पालिसाच्या मुलासोबत भांडणे झाल्यामुळे ,कात्रज पोलीस चौकीतील पोलिसांची मोटार चालकाला अमानुष मारहाण.
संपादक : दिलीप वाघमारे
पुणे शहरातील दक्षिणेकडील गजबजल्या कात्रज चौकातील रस्त्यावर रिक्षाचालकासोबत मोटारचालकाच्या झालेल्या वादामधून पोलिसांनी दोघा जणांना कात्रज पोलीस चौकीत नेऊन बेदम मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. या मोटारचालकाला पोलिसांनी अक्षरशः गुरासारखे बदडले. त्याच्या पायाला आणि डोळ्याला मुका मार लागला आहे. या तरुणाला ससून रुग्णालयात दाखल व्हावे लागले. दोन-तीन दिवस उपचार घेतल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आले. जखमी तरुणाने शिव प्रहार संघटना अध्यक्ष संतोष मोहिते यांच्याकडे न्यायासाठी दाद मागितली असता, मोहिते यांनी निगडे यांना सोबत घेऊन पोलीस आयुक्तांकडे याबाबत तक्रार केली असून दोषी पोलिसांवर कारवाईची मागणी केली आहे.
हनुमंत अंकुश निगडे सध्या राहणार दत्तनगर पुणे, मूळ राहणार भोंगवली तालुका भोर जिल्हा पुणे असे जखमी तरुणाचे नाव आहे. ही घटना २० जानेवारी रोजी दुपारी पावणेपाच वाजण्याच्या सुमारास घडली. निगडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, निगडे आणि त्यांचे मेहुणे तुषार शितोळे हे दोघे त्यांच्या मोटारीतून कात्रजजवळील मांगडेवाडीवरून दत्तनगरला निघाले होते. कात्रज चौकातील सिग्नल लागल्याने ते सिग्नलला उभे होते. त्यावेळी डाव्या बाजूला एक ऑटो रिक्षा उभी होती. शितोळे यांनी या रिक्षाचालकाला गाडी बाजूला घेण्याची विनंती केली. तेव्हा, रिक्षाचालक आणि त्याच्यासोबत असलेल्या मित्राने शितोळे यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. ही भांडणे सोडविण्यासाठी निगडे खाली उतरले.
हा गोंधळ सुरू असताना तेथे मार्शल ड्यूटीवरील दोन पोलीस कर्मचारी तेथे आले. पोलीस अंमलदार मंगेश गायकवाड आणि किरण साबळे अशी त्यांची नावे होती. या दोघांनी भांडणे सोडविली आणि सर्वांना पोलीस चौकीमध्ये नेले. रिक्षाचालकाचे वडील पोलीस चौकीसाठी ‘झिरो’ पोलीस म्हणून काम करीत असल्याचे तक्रारदार यांनी सांगितले. पोलिसांनी कोणत्याही प्रकारची खातरजमा अथवा विचारपूस न करता निगडे आणि शितोळे यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी निगडे यांनी पोलीस अंमलदार गायकवाड आणि साबळे यांना ‘मारू नका,’ अशी विनंती केली. तसेच, आपला पाय अधू असून पायामध्ये रॉड असल्याचे सांगितले. मात्र, त्यांनी काहीही ऐकून न घेता लाकडी दांडक्याने तसेच पट्ट्याने मारहाण केली. त्यांच्या उजव्या पायाचा अंगठा मोडलेला असल्याचे सांगूनही त्यांनी बुटाचा पाय या अंगठ्यावर दाबून त्याच्यावर उभे राहिले.
वाद झाल्यानंतर तेथे आलेल्या मार्शल ड्यूटीवरील पोलिसांनी संबंधित रिक्षाचालक आणि त्याच्या साथीदाराला सोडून दिले. त्यांना का सोडले असे विचारले असता त्यांनी या दोघांना ससून रुग्णालयात पाठवल्याचे सांगितले. त्यावेळी निगडे यांनी तक्रार नोंदवून घेण्याची विनंती केली. मात्र, पोलिसांनी तक्रार नोंदवून घेण्यास नकार दिला. गायकवाड आणि साबळे यांनी नळाचे पाणी मगात घेऊन अंगावर फेकले. “तुला सोडणार नाही. तुला येरवडा जेलमध्ये पाठविणार,” अशी धमकी दिली. “आमच्या पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्याच्या मुलाचा तू गळा धरलास, मारहाण केलीस, आता तुला सुट्टी नाही,” असे म्हणत धमकावले. त्यानंतर, रिक्षाचालकाची आई पोलीस ठाण्यात आली. तिने देखील निगडे आणि त्यांच्या मेहुण्याला “मी तुला आता पोलीस ठाण्यातच मारीन,” असा दम दिला, असेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
साधारणपणे दीड ते दोन तास हा प्रकार सुरू होता.
त्यानंतर, रात्री दहा वाजण्याच्या सुमारास गायकवाड आणि न साबळे यांनी निगडे यांना “तुझं कसं काय करायचं?’ अशी विचारणा केली. त्यावर त्यांनी तुम्हाला योग्य वाटेल ते करा, असे निगडेनी सांगितले. पोलिसांनी त्यांना सोडून दिले. यावेळी निगडे यांनी आपल्याला खूप मारहाण झाली असून त्रास होत असल्याबाबत
सांगितले तसेच,दवाखान्यात नेण्याची विनंती दोघांना केली.दोघांनी त्यांना दवाखान्यात नेण्यास नकार दिल्यावर,सोडल्यानंतर निगडे खोपडेनगर येथील दवाखान्यात उपचार घेत असताना डॉक्टरांनी त्यांना मोठ्या दवाखान्यात उपचार घेण्याचा सल्ला दिला. दुसऱ्या दिवशी निगडे चौकीमध्ये गेले,मेडिकल करण्यासाठी तक्रार नोंदवण्याची विनंती केली. मात्र पोलिसांनी तक्रार दाखल केली नाही. त्याच्यानंतर निगडे यांनी शिव प्रहार संघटना संस्थापक अध्यक्ष संतोषजी मोहिते यांच्याकडे झालेल्या प्रकाराबद्दल न्यायासाठी मागणी केली.