गणेश शरदराव निगडे यांच्या मागणीला यश सारोळे एसटी थांबा अखेर मंजूरीचे आदेश.
दि. 20भोर :-सातारा ते पुणे या मार्गावर प्रवास करणाऱ्या एसटी गाड्यांना आता सारोळे (ता. भोर) येथे अधिकृत थांबा देण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, पुणे विभागाच्या दिनांक १७ जून २०२५ रोजीच्या पत्राद्वारे हा निर्णय घोषित करण्यात आला आहे. शिंदे गट शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख गणेश शरदराव निगडे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे ही मागणी मान्य करण्यात आली आहे. त्यांनी महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री नामदार प्रतापजी सरनाईक यांना ही मागणी केली होती. त्यास अनुसरून पुणे विभाग नियंत्रक अरुणजी सिया यांनी सखोल विचार करून ही सेवा सुरू करण्यास मंजुरी दिली आहे.
या निर्णयामुळे सारोळे भागांतील तसेच पुरंदर सिमेवरील गावांपर्यंत प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. पूर्वी सातारा ते पुणे एसटी गाड्या थांबा न घेता जात असल्याने ग्रामस्थांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. आता हा थांबा अधिकृत झाल्याने शालेय विद्यार्थी, नोकरदार वर्ग आणि वृद्ध प्रवासी यांना प्रवासात सुलभता मिळणार आहे.
हा निर्णय अमलात आणण्यासाठी संबंधित स्थानक प्रमुख, वाहनचालक व तिकीट तपासनीस यांना सूचनाही देण्यात आल्या आहेत. हा थांबा तात्काळ लागू करण्यात येणार असल्याचे परिवहन विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
सारोळे,भोंगवली व पंचक्रोशीतील ग्रामस्थांकडून या निर्णयाचे स्वागत होत असून गणेश निगडे यांचे विशेष आभार मानले जात आहेत.


