खेडशिवापूर टोलनाक्यावर चक्काजाम आंदोलनाची हाक! शेतकरी, अपंग आणि सर्वसामान्यांच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरण्याची वेळ!
पुण्यभूमी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
दि. 23 खेडशिवापूर (प्रतिनिधी) – शेतकरी कर्जमाफी आणि विविध प्रलंबित मागण्यांसाठी २४ जुलै रोजी सकाळी ९ ते १० या वेळेत खेडशिवापूर टोल नाक्यावर चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे.
हे आंदोलन प्रहार जनशक्ती पक्ष भोर, प्रहार अपंग क्रांती संघटना भोर, आणि बळीराजा शेतकरी संघटना, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले आहे.
शेतकरी, अपंग बांधव आणि सामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी उभारलेला हा लढा कोणत्याही पक्षीय, जातीय किंवा धार्मिक सीमांच्या पलीकडचा आहे, असे आयोजकांनी स्पष्ट केले आहे. आंदोलन पूर्णपणे शांततेच्या मार्गाने आणि कायदा-संविधानाच्या चौकटीत पार पाडले जाणार आहे.
राजगड पोलीस स्टेशनचे मा. पोलीस निरीक्षक यांना यासंदर्भात अधिकृत कळविण्यात आले असून, आंदोलन काळात कोणताही अनुचित प्रकार होणार नाही, याची खात्री दिली आहे.
“न्यायासाठी रस्त्यावर उतरणे गरजेचे!”
प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष अजय कांबळे म्हणाले, “शेतकऱ्यांचे जीवन अडचणीत आहे. अपंग बांधवांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळत नाही. त्यामुळे आता रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय नाही.”
प्रहार अपंग क्रांती संघटनेचे अध्यक्ष बापु कुडले आणि वेल्हा तालुकाध्यक्ष नामदेव वालगुडे यांनी देखील नागरिकांना मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
“एकत्र येऊ, हक्कांसाठी लढू!”
या आंदोलनाचा उद्देश कोणत्याही राजकीय प्रतिष्ठेपेक्षा सामान्य जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक हाच आहे. म्हणूनच सर्व समाज घटकांनी, संघटनांनी आणि नागरिकांनी एकत्र येऊन या आंदोलनाला पाठिंबा द्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.


