भोंगवली ग्रामपंचायतीच्या विकासकामांचा तपास अडला; दप्तर-नोंदी उपलब्ध नसल्याने चौकशीला ब्रेक
सारोळे :- भोंगवली ग्रामपंचायतीतील मा. सरपंच यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर ते पद सोडेपर्यंत केलेल्या विकासकामांची, शासनाकडून आलेल्या निधीच्या वापराची तसेच इतर खर्चाची चौकशी करण्यासाठी शिवप्रहार प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष संतोष मोहिते यांनी २० जानेवारी २०२५ रोजी पंचायत समितीकडे लेखी तक्रार दाखल केली होती.
या तक्रारीनुसार जिल्हा परिषद पुण्याच्या उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी चौकशीसाठी आदेश दिले आणि गट विकास अधिकारी, पंचायत समिती वेल्हे यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती झाली. मात्र चौकशीदरम्यान अंदाजपत्रके, मासिक सभा ठराव, देयके, मूल्यांकन आदी कागदपत्रे सादर झाली नाहीत.
वेल्हे येथील गट विकास अधिकाऱ्यांनी सादर केलेल्या अहवालात — “तक्रारीतील विकासकामांची माहिती तपासण्यासाठी आवश्यक नोंदी उपलब्ध न झाल्यामुळे चौकशी करता आली नाही, म्हणून प्रकरणाबाबत कोणताही ठोस अभिप्राय देणे शक्य नाही,” असे स्पष्ट करण्यात आले आहे.
या पार्श्वभूमीवर पंचायत समिती भोरने ग्रामपंचायत अधिकारी “जकाप्पा बिराजदार” यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा केली असता, “ग्रामपंचायतीकडे सदर प्रकरणाशी संबंधित कोणतेही दप्तर उपलब्ध नाही; तसेच ऑनलाईन अभिलेखही नाहीत,” असे सांगण्यात आले.
त्यामुळे, पंचायत समिती भोरने ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना या संदर्भातील अधिकृत लेखी अहवाल कार्यालयाकडे सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. आता अहवाल आल्यानंतरच पुढील कारवाई होणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
यावेळी संपादक मंगेश पवार (पुण्यभूमी न्यूज) यांनी या प्रकरणाबाबत ग्रामपंचायत अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.