सातारा तालुक्यात सैन्य भरतीतून लाखोंची फसवणूक करणारा युवक पोलिसांच्या ताब्यात
संभाजी पुरीगोसावी
सातारा :- आर्मीमध्ये भरती करून देतो असे सांगत लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या आर्मी जवानाला सातारा तालुका पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रितेश नितीन जाधव, रा. नेले किडगाव, ता. जि. सातारा यांना आरोपी प्रदीप विठ्ठल काळे (वय 28, रा. कोळे, ता. कराड, जि. सातारा) याने स्वतःला आर्मी क्लार्क असल्याचे सांगितले. आर्मीमध्ये ए.एम.सी. क्लार्क पदावर भरती करून देतो, असे सांगून वेळोवेळी ऑनलाइन व आरटीजीएसद्वारे एकूण 3 लाख 70 हजार रुपये घेतले. परंतु भरती न होता आरोपीने उडवाउडवीची उत्तरे दिली व नंतर संपर्क तोडला. यामुळे फिर्यादीची फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले आणि सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन मा. पोलीस अधीक्षक सातारा तुषार दोशी यांनी सखोल तपास करण्याचे आदेश दिले. त्यानुसार पोनि निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि विनोद नेवसे यांनी तपास करून आरोपी प्रदीप काळे याला पुणे येथून अटक केली. न्यायालयाने त्याला 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपी हा आर्मीमध्ये जीएनआर गनर पदावर कार्यरत असून, दोन महिन्यांपासून कर्तव्यावर गैरहजर आहे. यापूर्वीही त्याने कराड तालुक्यातील एका युवकाची नोकरी लावतो म्हणून फसवणूक केली होती.
सदर कारवाईत पोहवा संदीप आवळे, मनोज गायकवाड, पंकज डाणे, मपोहवा विद्या कुंभार, राजू शिखरे, शिवाजी वायदंडे, दादा स्वामी, प्रदीप मोहिते, पोका संदीप पांडव तसेच सायबर पोलीस ठाणे यांचे विशेष सहकार्य लाभले.
पोलिस अधीक्षक तुषार दोशीसाहेब यांनी आवाहन केले आहे की, अशा प्रकारे फसवणूक झालेल्या इतर युवकांनी आपल्या जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवावी.